-
Aliens Yetil Tevha (एलियन्स येतील तेव्हा)
कधी आकाशाकडे बघताना मनात येतं आपल्यासारखे कोणी तिथे असतील का? कधी मोबाईलवरून जग भटकताना वाटतं हा मोबाईल नव्हता तेव्हा काय करायचे सगळे? कधी रोबॉटच्या अजब बातम्या ऐकून डोक्यात चमकून जातं - हा माझ्यासारखा विचार करू शकतो का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर हा कथासंग्रह नक्कीच तुमच्यासाठी आहे. या पुस्तकातल्या कथा तुम्हाला एलियनच्या गंमतीजंमतीत सामील करून घेतील. डायनोसॉरच्या गूढ काळात नेतील. अगदी थेट चंद्रावर राहायला घेऊन जातील. या कथा भविष्य दाखवतात, पण ते खूप दूरचं नाही. कल्पनाशक्ती इथे भन्नाट झेप घेते, पण विज्ञानाचा तर्कशुद्ध हात घट्ट धरूनच. या कथांमध्ये साहस आहे. थरार आहे. अधूनमधून थोडा मजेदार गोंधळ आहे. मग आहात तयार या भन्नाट सफरीवर जायला ?
-
Mi Kokancho Doctor (मी कोकणचो डॉक्टर)
कोल्हापूरहून गगनबावड्याच्या घाटाने खाली उतरलं की तळकोकण सुरू होतं. घाट उतरल्यावर लगेचच लागतं तळेरे हे छोटं गाव. तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातलं तरुण डॉक्टर जोडपं शिक्षण संपवून प्रॅक्टिससाठी गाव शोधत इथे येऊन पोहोचलं. हे निवांत गाव त्यांना आवडलं आणि त्यांनी तिथेच मुक्काम ठोकायचं ठरवलं. कसलाही हिशोब न मांडता, कोणतेही आडाखे न बांधता. घाटावर वाढलेल्या या दोघांना कोकणातली रोखठोक अन् इरसाल माणसं भेटू लागली आणि एका धमाल नात्याची सुरुवात झाली. कोकणी माणसांनी लवकरच त्यांना आपलंसं केलं. त्या माणसांच्या या खुमासदार गोष्टी- कोकणी भाषेच्या गोडव्यासह आपल्या मनात उतरणाऱ्या.
-
Zapataleli Paval (झपाटलेली पावलं)
माणूस जात्याच 'एक्सप्लोरर' आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तो शोधत राहिला, त्यातूनच त्याचं जगणं घडत गेलं. अशाच काही आधुनिक फिरस्त्यांच्या या गोष्टी. यातला प्रत्येकजण आपलं सुखासीन आयुष्य सोडून बाहेर पडला. कुणाला नवनव्या गोष्टींचा, ठिकाणांचा, पदार्थांचा शोध घ्यावासा वाटला... कुणी इतिहासाच्या शोधार्थ निघालं, कुणाला डोक्यातल्या नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाव्याशा वोटल्या, कुणाला मनातल्या अस्वस्थतेला वाट करून द्यावीशी वाटली... तर कुणाला स्वतःचा शोध घ्यावासा वाटला. निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, चालीरीती यांतल्या अनाम, खडतर वाटा धुंडाळताना त्यांच्या साथीला होती... झपाटलेली पावलं!
-
Man Rutale Kshan (मन रुतले क्षण)
तीस वर्षांपूर्वी एक तरुण चाकोरीतलं आयुष्य जगणं नाकारून देशभर फिरतो. कधी एकटा, कधी सोबत बायको. कधी ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश- नागालँड-असाम या राज्यांत, कधी मध्य प्रांतातल्या आदिवासी भागात, तर कधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. कधी शिक्षकाच्या भूमिकेत, कधी पत्रकाराच्या, तर कधी निव्वळ फिरस्त्याच्या. या उमेदीच्या काळात त्याला जे बघायला, अनुभवायला, शिकायला मिळतं ते अस्सल अन् अतरंगी आहे. त्या अतरंगी अनुभवांच्या गाठोड्यातले हे काही क्षण. जगण्याचं दर्शन घडवणारे. चांगले-वाईट, सुखद - दु:खद अशा द्वैताच्या पार, धुक्यातल्या स्तब्ध पिंपळासारखे अस्तित्वाचा हिस्सा बनून गेलेले.
-
Gulamacha Jina,Andharatala Jagana (गुलामाचं जिणं अ
गुलामांचा जिंण अंधारातल जगण बीड हा दुष्काळाच्या छायेतला मागास जिल्हा. पाऊस कमी. सिंचन व्यवस्था नाही, त्यामुळे शेती नाही. उद्योगधंदे नाहीत, त्यामुळे हाताला काम नाही. मग माणसाने पोट भरावं कसं ? या परिस्थितीत जगण्यासाठी इथली माणसं उस तोडायला जातात. सांगली-कोल्हापूरपासून पार कर्नाटकपर्यंत. सहा सहा महिने बायको पोरांसह तिकडेच राहतात. त्यांच्या राहण्याला 'राहणं' कसं म्हणणार? फाटक्या-तुटक्या उघड्या खोपट्यातला तो संसार. पहाटे तीनपासून काम संपेपर्यंत गुरासारखं राबायचं. काहीबाही शिजवून पोटात ढकलायचं. रानटी प्राणी आणि रानटी माणसं यांच्या भीतीखाली जगायचं. कामगार म्हणून नोंद नसल्याने ना वेतननिश्चिती, ना बोनस, ना पेन्शन. पोराबाळांच्या शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या सगळ्या वाटा खुंटलेल्या जणू गुलामाचं जिणंच. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली. पण लोकांचं तोंड गोड करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या उसतोड कामगाराचं आयुष्य मात्र कडूजार आहे. 'भारत आमचाही देश आहे आणि आम्हाला इतरांसारखं मानाचं जगणं हवं आहे', असं त्यांचं म्हणणं आहे. उसतोड कामागारांचे प्रश्न, त्यांच्या बायकामुलांच्या समस्या, त्यांचं जिणं सुधारावं यासाठी शासनस्तरावर झालेले प्रयत्न, 'शांतिवन' या संस्थेमार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि मागण्या यांची दोन दशकांतील कामाच्या आधारे चर्चा करणारं पुस्तक.