Al Tamir
सौदी अरेबियातील एक शहर अल् तमीर. इथे फुलूस म्हणजे पैशाच्या मागावर असलेल्या भारतीयांच्या जथ्यात एक संवेदनशील शिक्षक आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वाट चुकून येतो आणि इथल्या कट्टर इस्लामिक राजवटीत अक्षम्य आगळीक करतो. त्याची आणि दोन भिन्न संस्कृतींच्या गाठभेटीची ही ‘ट्नॅजिकॉमिक’ कथा. उपभोगाचा अव्याहत पाठलाग करणारा आणि तो करताना आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वैशिट्यांना गोंजारणा-या भारतीयांच्या या कथेला जसे वाळवंटाचे रखरखीत संदर्भ आहेत, तसेच फक्त पैशासाठी परक्या आकाशाखाली स्वत:ची कोंडी अनुभवणा-या मजबूर व्यक्तींच्या एकाकीपणाचे सुद्धा. सौदी अरेबियाच्या कट्टर धर्मसत्तेची तसेच भारतीयांच्या आपसांतल्या हेव्यादाव्यांची आणि राजकीय प्रेरणांची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी गल्फमधील भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा वास्तववादी आलेख आहे.