Kardalivan Ek Anubhuti ( कर्दळीवन एक अनुभूती)
“कर्दळीवन : एक अनुभूती” हे प्रा. क्षितिज पाटुकले यांनी लिहलेले पुस्तक दि. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी श्री. क्षेत्र त्रंबकेश्वर नाशिक येथे प्रकाशित झाले. आहे. कर्दळीवनावरील हे पहिलेच पुस्तक आहे. गुरूचरित्रामध्ये कथा भाग असा आहे की श्री नृसिंह सरस्वती हे १३ व्या शतकात श्री शैल्य जवळील कर्दळीवनात पाताळगंगेच्या पात्रात बुट्टीत बसून गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप:साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती वारूळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकूडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होवून त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारूळातून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. कर्दळीवनाचा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला आणि दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ.स. २००० हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक रहात आहेत. कर्दळीवनात पहिल्यांदा जाऊन तेथील मूळ स्थानाचा शोध अकोल्याचे श्री दत्त महाराज यांनी इ.स. २००७ साली घेतला. कर्दळीवन यात्रेसंबंधी अनेक समज, अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा झाली की लगेच जाता येते. कर्दळीवनात जायला अवधुतांची आणि स्वामींची इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १ व्यक्ती काशी-रामेश्वरला जाते, १० लाखातून १ बद्री केदारनाथला जाते, २५ लाखातून १ नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखातून १ कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून १ च भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवना विषयी लोकांना फार माहिती नाही. कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जून, रत्नाकर इ. सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रूपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. कर्दळीवन यात्रा कशी करावी, तेथे कसे जावे, महत्वाचे फोन, मोबाईल क्रमांक, ईमेल, राहण्याची व्यवस्था इ. सर्व माहिती या पुस्तकात दिली आहे. कर्दळीवनाचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व याबाबत विवेचन केले आहे. लेखकाने आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून दत्तसंप्रदायाचा अभ्यास केला असून कलियुगातील दत्त अवतारांचे महत्वपूर्ण कार्य आणि अवतार यावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य केले आहे. महावतार बाबाजी, लाहिरी महाशय आणि शिर्डीचे साईबाबा यांचेमधील गुरू शिष्याचे नाते आणि मुस्लीम व ख्रिश्चन धर्माचा दत्तसंप्रदायाशी असणारा संबंध लेखकाने विशद केला आहे. कर्दळीवनाचा इतिहास सांगताना लेखकाने कर्दळीवनातील जैवविविधते विषयीही चर्चा केली आहे. हे पुस्तक वाचल्यावर कर्दळीवनात जावून आल्याची अनुभूती येते.