Shulpaniche Adbhut Vishwa (शूलपाणीचे अद्भुत विश्व)
शूलपाणीच्या झाडीत | प्रवेश करण्यापूर्वी... शूलपाणी हे नर्मदेचे हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फार फसवे आहे. झाडी म्हणावे तर झाडी सोडाच हो, पण उन्हापासून डोक्याचे संरक्षण करायला सावलीलासुद्धा झाड नाही. येथे आहेत फक्त डोंगर. उघड्या नागड्या, वैराण व एकांत डोंगरांचा अनंत विस्तार. दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतील हा सर्वात कठीण भाग आहे. यातून कोणीही परिक्रमावासी लुटल्याशिवाय जाऊ शकत नाही. भिल्लांच्या भीतीने अधिकांश परिक्रमावासी झाडी सोडतात, किंवा मग थंडीत जातात. उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले असतात, की त्यावरून अनवाणी चालणे अतिशय कष्टदायक असते. तहान लागते ती निराळीच. डोंगरामागून डोंगर, वळणामागून वळणे, डोंगरांच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडीवाकडी अरुंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गाने जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगराचा गजरा गुंफायला घेतलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या ऐंशी मैल लांबलचक विस्तीर्ण जागेला 'शूलपाणीची झाडी' असे संबोधले जाते.