Ek Hoti Aaji (एक होती आजी)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असलेले महान कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ही कादंबरी. आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे. ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक घरेलू प्रसंग लेखकाने नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने गुफलेले आहेत. तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती-? लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्या’ प्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल-