The Last Don ( द लास्ट डॉन)
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही, खरं तर, जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजांत, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे. हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची -- फार कशाला, सार्या जगाची -- डोकेदुखी बनते आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडं समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्यायसंस्थेशी, राजकीय नेत्यांशी किंवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपान्तर अत्यंत झपाट्यानं कॅन्सरमध्ये होतं. सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली 'माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतर्प्रवाह, अंतर्गत कलह, त्या 'माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढं उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं. प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बर्याचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता किंवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे. 'द डार्क एरिना’, 'फॉर्च्युनेट पिल्ग्रिम’, 'गॉडफादर’, 'फूल्स डाय’, 'द सिसिलियन’, 'ओमेर्ता’, 'द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबर्या आहेत. 'द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.