First To Die (फर्स्ट टु डाय)
विक्रमी खपाचे उच्चांक निर्माण करणारा सध्याच्या काळातील लोकप्रिय लेखक जेम्स पॅटरसन यांची एक खळबळजनक रहस्यकथा. वैयक्तिक गंभीर समस्या, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आणि नव्यानं फुलणारं प्रेम या तिहेरी पेचात अडकलेल्या लिंडसे बॉक्सर या महिला पोलिस इन्स्पेक्टरची रोमांचक कहाणी. नवपरिणीत जोडप्यांची हत्या करणारा विकृत खुनी आणि त्याला कोर्टासमोर खेचून कडक शासन देण्यासाठी कटिबद्ध झालेला 'वुमेन्स मर्डर क्लब'. भावी सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं रंगवत हनिमून साजरा करणार्या तरुण वधुवरांचे मृतदेह लाजिरवाण्या अवस्थेत उघडकीस येतात. योजनाबद्ध खून करणारा लिंगपिसाट गुन्हेगार एकेक पुरावा मागे ठेवत पोलिसखात्याची मती गुंग करुन सोडतो आणि या रहस्याची उकल करण्यासाठी, स्वत:च्या अडचणीवर मात करुन, लिंडसे बॉक्सर आकाशपाताळ एक करते. तिच्या या धडपडीला उत्तम साथ देतात, अन्य तीन महिला - एक बातमीदार, एक सरकारी वकील आणि एक शवचिकित्सक डॉक्टर - रहस्याच्या या भोवर्यात वाचकही वेगानं फिरत राहतो...