Film Makers (फिल्म मेकर्स)
गणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन. -सुमित्रा भावे