Une Ek (उणे एक)
पति-पत्नीचं नातं वर्षामाजी बदलत जाणारं. नवनवा चेहरा धारण करणारं. अत्यंत चिवट, चिकट आणि खोलवर रुतलेलं. या नात्याचा पोत बदलत जातो, वीण उसवत जाते, विरत जाते, रंग फिके, गडद होत जातात. मोडतोड होते, सांधे तुटतात, फाटे फुटतात; तरीही एक अदृश्य धागा, हे नातं अभंग ठेवतो. अबाधित ठेवतो. सैल पडलेली बंधन एखाद्या लहानमोठ्या प्रसंगानं परत घट्ट विणली जातात. प्रेमाच्या नाना छटा, स्वार्थाच्या कित्येक परी, सवयीची सोबत, घरातले, समाजातले कित्येक घटक या नात्याला सतत जीवदान देत असतात. चाळीसपन्नास वर्षं आपण या समोरच्या व्यक्तीबरोबर कशी घालवली, म्हणता म्हणता चार कापरे हात एकत्र येतात. हळुवार मिठी पडते. अशा या पटावरून एक सोंगटी उठून गेली तर उरते एक सोंगटी. एकातून उणे एकच अशी. ज्योत्स्ना देवधर यांच्या अल्पाक्षरी, अर्थबहुल, चित्रमयी शैलीचा मराठीला आणखी एक नजराणा – आणखी एक कादंबरी – उणे एक.