His Day (हिज डे)

समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’

Book Details

ADD TO BAG