Shesh (शेष)
भूक माणसाला किती लाचार बनवते! आम्ही सगळ्या बहिणी दोन वेळचं पोटाला काही मिळावं म्हणून वणवण करत होतो. वय लहान, आणि भूक मोठी. जेवणाच्या वेळेला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायचं. नाइलाज म्हणून त्या घरातली बाई आत बोलवायची आणि मग तिच्या रागासकट, तिच्या जिव्हारी लागणार्या शब्दांसकट जे पानात पडेल ते गिळायचं. त्या घरातल्या पुरुषाची नजर अंगावरून फिरत राहायची. किळस यायची- जणू ती नजर नग्न करत आहे. पण निर्लज्ज व्हायचं; कारण पोटात भुकेचा वणवा पेटलेला असायचा. आणि तोच वणवा त्या पुरुषाच्या नजरेत पेटलेला असायचा. दोन्ही भुका शारीरिक.....एक भूक वणवा शमवणारी आणि एक भूक वणवा अजून चेतवणारी...