Maharudra (महारूद्र)
पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.