Golmaal (गोलमाल)
‘‘हे पहा, बाहेर टळटळीत दुपार आहे. उजेड नुसता पावसानं कोसळणाऱ्या दरडीसारखा अंगावर कोसळतोय. तरीही तो बाहेरच ठेवून इथं मिट्ट काळोख केल्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाहीय. मघाशी तुम्हाला दिलेली कॉफी जीभच काय पण हातही भाजेल इतकी कडकडीत होती. त्यात पाक होण्याइतपत साखर घातली होती; पण ती तुम्हाला प्रेतासारखी थंडगार आणि खारट लागली. उलट तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या कपात बर्फाचा खडा आणि चमचाभर मीठ घालताच ती तुम्हाला व्यवस्थित वाटली. आज उन्हाळ्याचा कडाका आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारं टेम्परेचर आहे. आणि तुम्ही अर्धा डझन ब्लँकेट्स अंगावर घेऊनही थंडीनं कुडकुडताय. मी तुमच्या गालावर सॅन्डपेपर फिरवला तेव्हा तुम्हाला कोणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं हुळहुळलं. उलट कापसाच्या बोळ्यांत कोणी टाचण्या का ठेवल्यात म्हणून तुम्ही बोंब ठोकलीत. निरनिराळे रंग मी तुम्हाला दाखवले तेव्हा जांभळ्याच्या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसला, तांबड्याच्या जागी हिरवा आणि नारिंगीच्या ऐवजी निळा. आता समजलं, तुम्हाला काय झालंय ते?’’