Gonidanchi Durgchitre (गोनीदांची दुर्गचित्रे)
शिकण्याला वयाची मर्यादा नसते, असं म्हणतात. सृजनशील लेखक आणि दरयाखोऱ्या पिंजून काढणारे दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांनी हे सिद्ध केलं आहे. वयाच्या चाळीशीनंतर कॅमेऱ्याचं तंत्र समजावून घेऊन कुशल छायाचित्रकार म्हणून त्यांनी निसर्गाला कॅमेराबंद केलं. त्यांनी काढलेल्या दुर्गाचित्रांचा हा अनोखा संग्रह. शिवनेरी, पुरंदर, तुंग, लोहगड, राजगड, रायगड, यांसारख्या किल्ल्यांबरोबरच त्या किल्ल्यांवरील मंदिरं, गुहा, माची अशा चहुबाजूंनी त्यांनी तो गड न्याहाळलेला दिसतो. शिवाय वेंगुर्ल्यासारखे बंदर, पैठणसारखं तीर्थक्षेत्र, कैलासलेणी, जेजुरीच्या खंडोबाचं देऊळ आदि ठिकाणं कॅमेराबंद झाली आहेत. परिसर जिवंत करणारी, ही कृष्णधवल छायाचित्र इतिहासाची साक्ष देतात. त्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात. 'गोनीदां'च्या नजरेतून ही दुर्गायात्राच घडते.अग्रगण्य कादंबरीकार आणि दुर्गभ्रमणकार दिवंगत गो. नी. दांडेकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे संकलन. वीणा देव यांनी संकलन आणि संपादन केलेल्या या पुस्तकात "गोनीदां'नी काढलेली विविध किल्ल्यांची छायाचित्रे आहेत. राज्यातील प्रत्येक किल्ल्याला भेटी देऊन गोनीदांनी काढलेले हे फोटो या किल्ल्याचे वैभव सांगतात. पंचवीस वर्षांच्या दुर्गभ्रमंतीच्या कालखंडात त्यांनी अनेक ठिकाणे टिपली. ही सगळी छायाचित्रे म्हणजे राज्यातील गडकिल्ल्यांची सफरच आहे. प्रत्येक छायाचित्राखालच्या ओळी त्या परिसराची नेमकी माहिती देतात. या छायाचित्रांपैकी काही छायाचित्रांत असलेल्या वास्तू आता नाहीशा झाल्या आहेत. एका अर्थाने ही छायाचित्रे त्या वैभवाची साक्ष देणारे पुरावेच आहेत. "गोनीदां'नी छायाचित्रण कलेतही प्रावीण्य मिळवले होते, याची प्रचिती ही छायाचित्रे देतात. या छायाचित्रांमुळे शिवकाळच जागा होतो. ही छायाचित्रे पाहून ही ठिकाणे बघायलाच हवीत, अशी इच्छा होते.