Ghas Ghei Panduranga (घास घेई पांडुरंगा)
ज्ञानदेव व त्यांच्या भावंडांची तसेच समकालीन संतांची अभंगरुपी चरित्रे लिहिणारे नामदेव आद्य चरित्रकर समजले जातात. पांडुरंगासमोर चोखोबांची संधी बांधणारे नामदेव आद्य अस्पृश्योधारक आहेत, तर परधर्मीयांचा प्रभाव जाणवणाऱ्या सीमेवरील पंजाब प्रांतात राहून तेथे भागवत धर्माचे व्यासपीठ उभे करणारे व उत्तरेकडील भाषेत अभंग रचना करणारे नामदेव आद्य समाजकारणी व भारतीय एकात्मतेचे उद्गाते आहेत. जनाईला संतपदी नेणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य प्रचारक आहेत. नामदेवांचे हे आगळेपण रवींद्र भात यांनी 'घास घेई पांडुरंगा' या नामदेवांवरील कादंबरीत व्यक्त केले आहे. नैवद्याचा घास घेण्यासाठी घेण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्याऱ्या बाल नामदेवांच्या लीलांपासून पूर्ण ज्ञानाची आस व गुरुकृपेची ओढ लागलेल्या आणि ज्ञानदेव - निवृत्तीनाथ, मुक्ताई यांच्या मेळ्यात रंगणाऱ्या संत नामदेवांचेचरित्र यात रेखाटले आहे. नामदेव, जनाबाई यांची काव्यरचना, राजाईच्या निवडक अभंगाचा कादंबरीत उपयोग केलेला आहे. पंजाबमधील घुमान गावात नागदेवांनी भागवत धर्माचा प्रसार केला. तेथील त्यांच्या कार्याची महती व त्यांनी हिंदीत केलेल्या रचना यात आहेत. माणूसधर्माचा विचार कृतीत उतरवून नंतर तो लोकांमध्ये रुजविणाऱ्या संत नामदेवांचे विचर आजच्या समाजासाठी आदर्श आहेत.