Nandini (नंदिनी)
नंदिनी, समाजाने आखून दिलेल्या नातेसंबधाची चौकट ओलांडत, जे गमावलंय ते मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आयुष्यातील दोन घटनांच्या दरम्यान घडणाऱ्या एका स्त्रीची भावनिक, आर्थिक, शारिरीक आंदोलने मोठ्या तरलतेने कादंबरीत टिपलेली आहेत. इथे एका बाजूला आईचे मुलीसाठी तुटणारे काळीज दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला तीच आई तिच्या आवडत्या माणसाच्या प्रेमासाठी होरपळताना दिसत आहे. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे काय... स्त्रीचे स्वतंत्र असे काही अस्तित्व असते का? तिला प्रेम करण्याचा हक्क असतो का...? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कांदबरीत लेखिका शोधत आहे. मराठी कादंबरीविश्वातील स्त्रीवादी विचारांचा प्रवास 'कळ्यांचे निश्वास' पासून 'भिन्न' कादंबरीपर्यंत पोहचला आहे. या प्रवासातील एक पुढचे आशादायी वळण म्हणजे शिल्पा गंजी यांची 'नंदिनी' ही कादंबरी आहे. -शिल्पा कांबळे (लेखिका आणि पटकथाकार)