Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.