Safarnama Nivadak Kalakarancha (सफरनामा निवडक कलाकारांचा)
कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दृश्यकलेमध्ये महत्त्वाचे बदल होत गेलेले आपणास ठळकपणे जाणवतात. या कालखंडातील कलावंतांनी आपल्या कलेमध्ये आधुनिक मूल्यांचा जाणीवपूर्वक पुरस्कार केलेला आपणास दिसतो; त्यातही आपल्या कलेद्वारा त्यांनी जीवनवादी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आपल्याला दिसते. सुरुवातीचा प्रागैतिहासिक काळ सोडला, तर एका बाजूला ग्रीक आणि रोमन संस्कृतीपासून तर्काधिष्ठित वास्तव चित्रणावर भर देणारा पाश्चात्त्य कलाविचार दिसतो तर दुसऱ्या बाजूला भारतीय, पौर्वात्य कलाविचार दिसतो, जो की अंत:प्रेरणेतून बाह्य जगाकडे पाहतो आणि काहीसा प्रतीकात्मकसुद्धा आहे. मात्र असे असले तरी कलाइतिहासाच्या त्या त्या टप्प्यांवर या कलाविचारांची सरमिसळ झालेली आपल्याला दिसते. रवीन्द्रनाथ टागोर, जामिनी राय, अमृता शेर - गील, कॅथे कोलविट्झ, फ्रिडा काहलो हे कलावंत त्याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. हे कलावंत केवळ रंजनवादी कलावंत नव्हते; तर कलेत जीवनाचे प्रयोजनमूल्य अधोरेखित करणारे कलाविचारक होते. ‘सफरनामा : निवडक कलाकारांचा' या पुस्तकातून मुळात चित्रकर्ती आणि कलाअभ्यासक असलेल्या पल्लवी पंडित यांनी जागतिक स्तरावरील अशाच काही कलाकारांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या कलेचा आणि त्यामागील असलेल्या कला- विचारांचा धांडोळा अतीव चिकित्सकतेने व तितक्याच सूक्ष्मपणे घेतला आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. - प्रमोदकुमार अणेराव