Harkamya (हरकाम्या)
लतिफ हा किशोरवयीन मुलगा पॅराडाईज लॉजमध्ये कामाला लागतो आणि त्याचं भावविश्वच बदलून जातं. लॉजमधला हा हरकाम्या. सतराव्या वर्षी वडिलांना गमावलेल्या लतिफची गोष्ट त्याचं बेट आणि शहरातल्या लॉजच्या आवारातच घडते. दोन छोट्या बहिणी आणि आईची जबाबदारी पेलायला लतिफला नोकरी करावी लागते. लॉजवर काम करत असताना तिथं राहायला येणाऱ्या प्रवाशांविषयी त्याच्या मनात कुतूहल असतं. कधी तो दरवाज्यातून डोकावल्याबद्दल मारही खातो. तर कधी एका आत्महत्त्या केलेल्या अभिनेत्याचा शर्टही स्वतःकडे ठेवून घेतो. लॉजच्या कामादरम्यान तिथंच झाडूपोछा करणाऱ्या स्टेलाशी त्याची गट्टी जमते. एकत्र जेवतेवेळी तो तिला एका कल्पित मित्राची गोष्ट सांगत असतो. पण एके दिवशी त्याच्या या वरकरणी सुरळीत सुरू असलेल्या जगण्याला सुरूंग लागतो. आणि गोष्ट अस्वस्थ करणाऱ्या वळणावर पोहचते.