-
The Silent Film (द सायलेंट फिल्म)
भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाचा हा विस्तृत पट आहे. काय केलं नाही दादासाहेबांनी? फोटोग्राफीचा व्यवसाय केला. प्रेस चालवला, नाटक केलं, कलात्मक वस्तू विकल्या आणि चित्रपटाच्या ध्यासाने तर ते ‘भारतीय चित्रसृष्टीचे जनक’ झाले. चित्रपटनिर्मितीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. नावलौकिक, यश आणि पैसाही मिळाला त्यांना चित्रपटनिर्मितीतून; पण व्यवहारज्ञान कमी, शीघ्रकोपी स्वभाव, तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती, हितशत्रूंचा त्रास, सर्वोत्तमाचा ध्यास यामुळे त्यांच्या पैशांना आणि यशाला ओहोटी लागली. यश-अपयशाचा लपंडाव त्यांच्या जीवनात सदैव सुरू राहिला. त्यांचं कलासक्त मन सदैव अतृप्त राहिलं. तर एका कलासक्त जीवनाची ही संघर्षमय कहाणी आहे. मूकपटांच्या इतिहासालाही त्या निमित्ताने उजाळा मिळतो. दुर्मिळ छायाचित्रांनी सजलेला , व्यामिश्रतेने साकारलेला जीवनपट.
-
Independence (इंडिपेन्डन्स)
१९४६ चा भारत. बदलाचं वारं घेऊन आलेला. अशा भारतातल्या बंगालमधील राणीपूरमध्ये राहणाऱ्या डॉ. नंदकुमार यांच्या तीन मुलींची ही गोष्ट. प्रिया, जामनी आणि दीपा यांची. फाळणीच्या दंगलीत डॉ. नंदकुमार यांची हत्या होते. आणि तिघींचं आयुष्य पार बदलून जातं. प्रियाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न एका दृढ निश्चयात परिवर्तित होतं, तर दुसरीकडे जामनी आणि दीपा आपल्या आईला रजाई बनवण्यात हातभार लावून घर सावरतात. त्याचवेळी दीपा मुस्लिम लीगच्या रजाच्या प्रेमाने झपाटून जाते आणि घरदाराला अंतरते. रझासोबतच्या प्रवासात तिचा देशही सुटतो. या सगळ्यात जामनी मात्र आईचा आधार बनून राहते. पण तरीही फाळणीची झळ तिला सुखानं जगू देत नाही. या लाटेत तिन्ही बहिणींचं आयुष्य हेलकावे खात राहतं. या तीन बहिणींची गोष्ट वेगवान कथानकासोबत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनाक्रमाने अचंबित करत राहते.
-
Dnyanyogi Eknath (ज्ञानयोगी एकनाथ)
संत एकनाथांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. एकनाथांच्या घराण्याची पूर्वपीठिका, त्यांचं जन्मरहस्य, त्यांचा जन्म ते त्यांनी घेतलेली जलसमाधी इथपर्यंतचा प्रवास या कादंबरीतून उलगडला आहे. एकनाथांचं बालपण, त्यांचा गुरूशोध, जनार्दन स्वामींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्या सहवासात बहरत गेलेली त्यांची प्रतिभा, शूलभंजन नावाच्या छोट्याशा पर्वतावर त्यांनी केलेली तप:साधना, त्यांनी वेळोवेळी रचलेले अभंग, भारुडं, गवळणी, चतु:श्लोकी भागवताचं मराठीत केलेलं भाषांतर, चातुर्वर्ण्य, शिवाशिव, अस्पृश्यांना मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून-बोलण्यातून व्यक्त केलेली नाराजी, त्यामुळे त्यांना सनातन्यांचा झालेला विरोध, गिरिजेशी झालेला विवाह, ज्ञानेश्वर-माउलींच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचं एकनाथांच्या हातून घडलेलं कार्य इ.प्रसंग-घटनांतून त्यांचं संपन्न गृहस्थाश्रमी आणि आध्यात्मिक जीवन उलगडत जातं. एकनाथांच्या जीवनावरची रसाळ, भावसंपन्न कादंबरी.