-
Stri Virudh Purush?(स्त्री विरुद्ध पुरुष?)
त्री आणि पुरुष या दोघांचे अस्तित्वच मुळी एकमेकांशिवाय अशक्य असताना परस्परांमध्ये सामंजस्याऐवजी संघर्षच जास्त का, भेदाभेदांचे निमित्त करून विषमता का, अशा अनेक प्रश्नांचा निखळ मनुष्यवादी दृष्टिकोनातून ऊहापोह करणारे हे पुस्तक संवेदनशील वाचकांच्या मनातील असंख्य समजुतींना धक्का देते. स्त्री-पुरुष नात्याचे नर आणि मादी याखेरीजही किती लोभस फुलोरे आहेत, हे पटवून देत नव्या सहजीवनाच्या मार्गाकडे सहजपणाने घेऊन जाते. नकळत परिवर्तन घडवून आणते.
-
Eklavya(एकलव्य)
श्री दासबोध' ह्या लोकोत्तर ग्रंथात सच्छिष्याची लक्षणं विस्तारानं विशद करताना श्रीसमर्थ रामदास म्हणतात : ऐसे सच्छिष्यांचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढभाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती॥ (दशक पाचवा, समास तिसरा) ... असं सच्छिष्याचं वैभव असतं. सद्गुरुस्वरूप प्राप्त करून घेतलेला पहिला सर्वोत्तम शिष्य एकलव्य. त्याची ही चरितकहाणी आद्य एकलव्याच्या कापल्या अंगठ्यातून गळणार्या रक्ताच्या कणाकणांतून कधी जात, कधी धर्म, कुठं रक्तशुद्धी, कुठ वर्ण अशा कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज नवनवे एकलव्य जन्माला येत आहेत; आणि आयुष्यातील छोट्या-मोठ्या संघर्षाला भिणारे, पोटासाठी लाचार झालेले द्रोणाचार्यही पावलोपावली भेटत आहेत. महाभारत-काळापासूनच ज्ञान आणि पोटभरू विद्या यांची गत सुरू झाली. ज्ञानोपासक आत्मकेंद्रित, अहंमन्य, लाचार व पोटार्थी बनले. त्यामुळं ज्ञान व समाजाची नैतिक घसरगुंडी झाली. स्वार्थप्रेरक, पक्षपाती आणि उच्च जीवननिष्ठा न देणारं ज्ञान हेच व्यक्तीच्या आणि समीच्या र्हासाचं व अपकर्षाचं मुख्य कारण होत गेले. या चरितकहाणीचा मूलस्त्रोतच हा आहे. प्रत्येक ज्ञानपिपासूनं वाचायला हवीच, अशी ही कथावस्तू आहे.
-
Farasi Premik(फरासि प्रेमिक)
मायभूमीपासून दूरवर एका विलक्षण शहरात गेलेल्या एका स्त्रीच्या प्रेम आणि स्वातंत्र्यशोधाची कहाणी 'फरासि प्रेमिक' ही कथा आहे, नीलांजना मंडल या बंगाली तरुणीची. उपाहारगृहमालक अणार्या किशनलालशी विवाह झाल्यानंतर ती पॅरिसमध्ये येते. पॅरिसमधल्या किशनलालच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये नीलाला सोनेरी पिंजर्यात कोंडल्यासारखं वाटतं. लग्नानंतर तिच्या आशा-आकांक्षा पूणृ हाणं तर बाजूलाच, पण घरात केवळ मोलकरीण आणि शयनेषू रंभा... एवढंच तिचं स्थान पाहून तिचा जीव घुसमटतो. या कंटाळवाण्या, निराशेच्या गर्तेत निघालेल्या आयुष्यातून कुठं मोरपिशी वाट फुटतेय का ? यासाठी नीला आतुर असते आणि अशा वेळी तिच्या अयुष्यात येतो बेनॉयर ड्यूपॉन्ट... गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा राजबिंडा फ्रेंच तरुण, नीला त्याच्या प्रेमात आकंठ बुडते. बेनॉयर तिची पॅरिसमधल्या रस्त्यांशी, कॅफेजशी, कलादालनांशी ओळख करून देतो... नीलासमोर जणू सर्वस्वी नवं विश्व खुलं होतं. बेनॉयरशी तिचे अगदी उत्कट शारीरिक, भावबंध जुळलेले असतात. हळूहळू इथंही तिला स्वत:च्या आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवाव्या लागतात. अखेर बेनॉयरचं प्रथम प्राधान्य स्वत:ला आहे. त्याचं फक्त स्वत:वर प्रेम आहे... आपल्या प्रियतमेवर नाही, हे उमगल्यावर त्यांच्या संबंधांना पूर्णविराम मिळतो, पण तिच्या आत्मशोधाच्या मार्गाचा आत्ता तर कुठे प्रारंभ झालेला असतो... धाडसी संकल्पनेवर आधारलेली ही कादंबरी लेखिकेनं अतिशय ताकदीनं मांडलेली आहे. निष्ठुर जगात स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणार्या एका स्त्रीच्या मनोवस्थांचं वेधक चित्रण या कादंबरी आहे.
-
The Afghan(द अफगाण)
रेड फ्लॅग नोटिस जारी केलेल्या फोनवरून केला गेलेला एकच फोन, छापा मारल्यावर लॅपटॉप हातात पडू नये म्हणून त्याची मोडतोड करायचा प्रयत्न, स्वत: पकडले जाऊ नये म्हणून चौथ्या मजल्यावरून घेतलेली उडी ब्रिटिश आणि अमेरिकन इन्टेलिजन्स एजन्सीजची एवढीच खात्री पटते की, जगाला थक्क करेल अशा भयानक घातपाताचा कट अल काईदाने रचलेला आहे. पण तो कोणत्या स्वरूपाचा आहे, कधी घडणार आहे आणि लक्ष्य काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. अल काईदामध्ये स्वत:चा माणूस घुसवून कुठल्याही त-हेची माहिती काढणे आजपर्यंत त्यांना कधीही जमलेले नाही. अफगाण आहे इझमत खान, ग्वाटेनामो बे इथे पाच वर्षे तुरुंगात असलेला तालिबान कमांडर आणि अफगाण आहे इराकमध्ये जन्मलेला, पंचवीस वर्षे जगाच्या कानाकोप-यात लढल्या गेलेल्या युद्धांचा अनुभव असलेला कर्नल माईक मार्टिन. जबरदस्त पूर्वतयारी आणि दैवावरच भरवसा ठेवून, जिथल्या भीषण गोष्टींची कल्पना करणेही केवळ अशक्य आहे, अशा अंधा-या अरब जगतात अरब म्हणून इझमत खान म्हणून वावरत कर्नल माईक मार्टिन त्या कटाचा छडा लावू शकेल ?
-
The God Of Small Things(द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज)
पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ह्या लेखनाचे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीति आणि नियतीच्या पाशामधील अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणार्या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक पणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख, अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्या सारखे धावत राहतात. विणले जातात - त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:त वेगळे करता येत नाही - कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्न्ता हे सारेच गूढ अजब चेटूक आहे - अश्या शब्दात जागतिक पातळीवर वाखाणल्या गेलेल्या ह्या 'बुकर पुरस्कार’ विजेत्या कादंबरीचा हा अनुवाद अपर्णा वेलणाकर ह्यांनी इतक्या समरसतेने केला आहे की त्यांनाही साहित्य अकादमीने त्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविले आहे.