-
Vikram Vetal Ani Kala Nirnay Ghenyachi (विक्रम-वेत
विक्रम-वेताळच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र या कथांचा उपयोग एखादे व्यवस्थापनाचे तत्त्व शिकण्यासाठी कसा करता येईल, असा विचार केला गेला नव्हता. इथे याच कथांचा आधार घेत व्यवस्थापन तत्त्व अत्यंत सोपेपणाने समजावून सांगितले आहे. रंजक शैलीत कथा सांगून एखादा निर्णय हुषारीने कसा घ्यायचा याबाबतचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.
-
Manat ( मनात )
अच्युत गोडबोले लिखित "मनात' हे मानसशास्त्रावरचं पुस्तक अलीकडंच प्रसिद्ध झालं. केवळ सात आठवड्यांत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात "मनाचे श्लोक' बहुधा प्रत्येकानंच वाचलेले असतात. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या "मन' नावाचं प्रकरण लेखकाच्या मध्ये येतच असे. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या "मनाच्या' दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखकाला मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ दिलेलं दिसतं. अर्थात हे पुस्तक जाणत्या पण सर्वसामान्य वाचकांना कळेल, अशा भाषेत समजवायचं या विचारानं जन्माला आलं. सर्वसामान्य माणसानं ठिकठिकाणी मनाविषयी ऐकलेल्या कथा, संकल्पना, शास्त्रज्ञांची नावं, त्यांचं जे कुतूहल चाळवलं जातं, त्याला शास्त्रीय ज्ञानाचा पाया या ग्रंथाच्या वाचनातून जरूर लाभतो. मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच वाचक त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. यातल्या प्रकरणांची नावं वाचल्यावरच आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर ज्ञानाची किल्ली सापडल्याचा आनंद होतो. मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट संकल्पना किंवा शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी नामसूचीही दिलेली आहे. सर्वसामान्य वाचकांच्या हाती हा ग्रंथ देताना या विविध विभागांची केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती न देता तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे, पण तरीही अत्यंत उत्कटतेनं लेखकानं केलेला जाणवल्याशिवाय राहत नाही. अनेक पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचा आधार घेतानाचा पौर्वात्य ज्ञानशाखा आणि तत्त्वज्ञान यांचाही सुरेख मेळ लेखकानं साधला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाचा समर्पक संदर्भ देताना लेखकानं आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला शोधून दिली आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना मधल्या प्रवासातील, प्रक्रियेतील आनंदही तितक्याच उत्कटतेनं उपभोगला पाहिजे. अंतिम साध्य शेवटी लाभत नाही, तर ते प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं सापडत जातं. त्याचं "सेलिब्रेशन' करतच ही सफर पुढं चालली पाहिजे. प्रसिद्ध सामाजिक विचारवंत आणि संशोधक डॉ. अभय बंग आणि डॉ. प्रकाश आमटे, प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी बापट, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे, समाजाचं मानसशास्त्राबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर, विविध विद्यापीठांतले मानसशास्त्राचे विभागप्रमुख अशा सर्वांनी मन:पूर्वक दिलेल्या अभिप्रायांनी "मनात' या पुस्तकाच्या उपयुक्ततेवर आणि सौंदर्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. तसंच त्यांच्या प्रतिक्रियांमधूनग्रंथाची उंची आणि खोलीही अधोरेखित झाली आहे.
-
Drohparv ( द्रोहपर्व )
इ.स. १७७३ ते १७७९ शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा... रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ... निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया.... सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात... संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र... ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट... इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत - ’वडगावच्या लढाई’त - इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाता! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी.
-
Sukhi Nivrutt Jivanasathi ( सुखी निवृत्त जीवनासाठी
सेवानिवृत्तीनंतर जगण्याचं नवं पर्व सुरु होतं. त्यासाठी आधीच्या जगण्याचं सिंहावलोकन करायला हवं. आयुष्यातील, उमेदीचा अधिकाधिक काळ नोकरी आणि संसाराच्या वर्तुळात 'स्व'चा शोध न घेता, सुखद आणि दुखद अशा अनेक प्रसंगांतून घालवलेला असतो. तो एका मुक्कामावर येऊन थांबतो. आणि वयाची जाणीव करून देतो. आता फक्त ख-या अर्थाने 'स्व'चा शोध घेत काळ घालवायचा असतो. तो कसा आणि कोणत्या मार्गाने घालवायचा, त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न.
-
Mazi Baherkhyali ( माझी बाहेरख्याली )
द्वारकानाथ संझगिरीचं 'माझी बाहेरख्याली' हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या अनेक अपरिचित ठिकाणांचा बोलका वेध तर आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त तो एका मार्मिक भाष्यकाराने घेतलेला तिथल्या संस्कृतीचा तिथल्या लोकजीवनाचा वेध आहे. त्यामुळेच यात निवळ प्रवासवर्णन नाही. हृदयाला भिडणाऱ्या, कधी अस्वस्थ करणाऱ्या तर कधी दिलखुलास हसविणा-या अनेक गोष्टी यात आहेत. त्यामुळेच क्रिक्रेटच्या मैदानावर घडणाऱ्या गोष्टींपेक्षा त्याच्या पल्याड दडलेलं एक जग हे पुस्तक वाचता आपल्या डोळ्यापुढे येतं. यातून खूप विलक्षण माणसंही भेटतात. त्यामुळेच पुस्तक हातात घेतल्यावर खाली ठेववत नाही. वेस्ट इंडीजचा यातून घडणारा परिचय तर केवळ अप्रतिम !
-
Ramniy Sagarkinare ( रमणीय सागरकिनारे )
सूर्योदयाबरोबर आकाशात होणारी चैतन्यदायी अभांची रंग उधळण आणि मावळत्या दिनकराची सोनेरी शीतल किरणे; यांच्याशी रंगसंगती साधते. समुद्रकिनारयांची आणि त्यांच्या लोभस वाळूची वळणे. सागरवेळा आणि तिची श्रवणीय गाज त्या रत्नाकरासारखेच विवध प्रकारच्या पुळणीनी गुंफलेले हे रमणीय सागरकिनारे म्हणजे भारतमातेच्या गळयातील जणू रत्नहारच!
-
Vishal Himaalay ( विशाल हिमालय )
सह्याद्रीप्रमाणेच हिमालयाच्या पर्वतरांगा पर्यटकांना आणि भक्तांना खुणावत असतात. गिर्यारोहकांना तर हिमालय आपला सखा वाटत असतो. डॉ. प्रकाश जोशी यांनी हिमालयाच्या रांगांतील विविध ठिकाणांची सफर कशी करावी, याचे मार्गदर्शन यात केले आहे. चार हजार किलोमीटर लांबीच्या या ग्रेटर हिमालयीन रांगांची ही सफर आनंद देते. घरबसल्या मानसयात्रा घडवून आणणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.