-
Sangatye Aika
एक प्रकारच्या निरागस वृत्तीने हंसाबाई आपल्या जीवनाकडे पाहात आहेत व त्याचे कथन करीत आहे. ह्या सर्वच कथनातून व्यक्त होणारा उदार समंजसपणा - ह्या समंजसपणाला सर्वत्र दुःखाची किनार आहे- 'सांगत्ये ऐका' या आत्मकथनाची पातळी एक सारखी उंचावीत आहे, बरेचसे अबोल असलेले हे हंसाबाईंचे आत्मचरित्र अत्यंत बोलके आहे. मराठीत आत्मगौरव, आत्मसमर्थन, आत्मस्पष्टीकरण, आत्मप्रदर्शन ह्या उद्देशांनी लिहिलेली आत्मचरित्रे बरीच आहेत. ह्यांतील अनेकातून व्यक्त होते ती विलक्षण आत्मसंतुष्टता. हंसाबाईंच्या आत्मकथनाला आत्मसंतुष्टतेचा दुर्गंध कसा तो येत नाही. सुगंध येतो तो दारुण असमाधानाचा. आपल्याच जीवनाचे सत्य आपणच अवलोकणे सोपे नसते. हे अग्निदिव्य हंसाबाईंनी केले आहे. यशाचा अभिमान नाही. भोगल्याचं दुःख नाही; अशा निःसंग निरामयतेमुळेच काळजाला भिडणारं हंसा वाडकरांचं आत्मचरित्र.
-
Jave Tichya Vansha
मराठीतील जुन्या नव्या कथाकारांच्या गर्दीत काही नावे आरंभापासूनच वेगळी उमटून पडली, त्यात प्रिया तेंडुलकर हे नाव येते. हा त्यांचा तिसरा कथा-संग्रह. ज्याचा त्याचा प्रश्न, जन्मलेल्या प्रत्येकाला हे आधीचे. सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाट्य हेरून ते साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळुवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्ट्ये. मात्र जीवनाकडे - यात स्त्री-जीवन आले - पाहण्याची स्वत:ची एक स्वतंत्र दृष्टी हे या लेखनाचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या कथांहून उजव्या कथा मराठीत भेटतील. या कथांहून डाव्या कथांचीही उणीव नाही. मात्र या कथांसारख्या कथा मराठीत फक्त प्रिया तेंडुलकर याच लिहू शकतात म्हणून या कथा-संग्रहाचे महत्त्व.
-
Asahi (असंही)
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले.यात वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदर-लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर सवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमितपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले, ते संग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते. परंतु हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतचे गंभीर भान आहे. यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे अजून एक पाऊल गेले आहे.
-
Janmalelya Pratyekala
गाडगीळ - गोखल्यांची नव-कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढे निघाली आहे. हे नावीन्य घाटाचे, तंत्राचे किंवा शैलीचे म्हणजे वरवरचे नसून गाभ्यातले, अनुभवाचे आणि त्या अनुभवाकडे बघण्याच्या निडर दृष्टीचे आहे. मराठी साहित्यात आजवर अ-स्पर्शित असे हे जीवनानुभव ही ज्यांच्या लेखनाची खासियत त्या कथाकारात प्रिया तेंडुलकर यांचा समावेश केला जातो. त्यांच्या एका कथा-संग्रहाची ही नवी आवृत्ती.
-
Panchatarankit
तिनं पाहिलं आहे! ’पंचतारांकित’ उपाहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग... हे जग जसेच्या तसे वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे. सत्यशोधकाची तत्त्वचिंतक बैठक बालपणापासूनच साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरिता झगडणारी ’रजनी’ तर ती आहेच! पण खरी आहे ती हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर...
-
Baimanoos
घरात बाईमाणूस असले म्हणजे घराला घरपण येते, असे म्हणतात. पण स्त्रीची अवहेलना गेल्या अनेक शतकांपासून होत आहे. स्त्रीला पुरुषापेक्षा दुय्यम, कमकुवत व दुर्बल समजल्याने तिच्या विकासाची पहाट स्त्रीमुक्ती चळवळीनंतर उगवली. स्त्री ही मानव आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला हक्क, अधिकार आहेत, तिला स्वतंत्र स्थान आहे, हे सांगण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे वर्णन 'बाईमाणूस' मधून करुणा गोखले यांनी केले आहे.