-
Shivgandh (शिवगंध)
मी फार काही न बोलता माझ्या मेक अप रूमकडे गेलो. जिरेटोप काढला. त्याला कपाळी लावला, समोरच्या मेजावर ठेवला, गळ्यातली कवड्यांची माळ काढली. तिला प्रणिपात केला आणि माझ्या नकळत डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. पंधरा एक मिनिटे मी ढसाढसा रडत होतो. माझ्या मेक अप रूममधून रायगडाच्या प्रवेशद्वारावरचा भगवा ध्वज फडकताना दिसत होता. मावळत्या सूर्याची किरणं त्यावर पडत असल्यानं निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो खुलून दिसत होता. डोळ्यांतून ओघळणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे काहीसं धूसर दिसत होतं. मला जाणवलं, माझ्यातून काही तरी निघतं आहे आणि ते त्या भगव्यामध्ये मिसळून जातं आहे. मी रिता होत होतो आणि मन समाधानानं भरून जात होतं.