-
Chavni (छावणी)
नामदेव माळी यांची 'छावणी' हि कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. ग्रामीण संस्कृतीच्या उदात्तीकरणाची भ्रामक भूमिका हि कादंबरी घेत नाही, त्याऐवजी या कादंबरीमधून ग्रामीण जगण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी धारणेतून लिहिली गेलेली असली तरी हा वास्तववाद सरधोपट वाटत नाही. त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची इच्छा आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांच्या भावविश्वाचे प्रत्ययकारक दर्शन छावणीमधून घडते. हे प्राण्यांचे जग अनित्याच्या भोवतालचे माणसांचे जग नामदेव माळी एकमेकांच्या शेजारी ठेवतात. हि दोन जगे आपापल्या जागी स्थिर राहत नाहीत. या भाष्यांमधून ग्रामीण जीवनाचे नवे व चिकित्सक भान छावणीमधून व्यक्त होऊ लागते.
-
Vrat Ani itar katha (व्रत आणि इतर कथा)
फकीर मुहम्मद कात्पदी यांची कथा आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून आम्हाला अपरिचित असलेले मुस्लिम समाजातले चढ-उतार दाखवतात. तेही आधुनिकतेची कस न सोडता. या लेखनातून जाणवणारा मानवी स्पर्श आणि अंत:करणाची आद्रता वाचकाच्या मनाला भावल्याशिवाय राहत नाही. तसंच कुठलाही धर्म स्वत:पुरता असतो,तेव्हा काही अडचण नसते. ते धर्म समोरासमोर ठाकतात,तेव्हा त्यात राजकारण येते. हा सगळ्यांनाच येणारा अनुभव या कथा देतात.
-
Sat Sakam Trechalis (सात सक्कं त्रेचाळीस)
लेखक किरण नगरकर यांची ही जळजळीत आणि बेधडक कादंबरी एक अस्वस्थ अनुभव देते. माणूस आणि त्याचे जगणे केद्रस्थानी असलेली आणि त्यातील असहायता, नश्वरता उलगडून दाखवीत देह व मनाच्या अपरिहार्य भोगाचे विखारी चटके देणारी ही कांदंबरी वास्तवाला थेट भिडते. ते सादर करण्याचे तंत्रही निराळे, स्तिमित करणारे, वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे, भाषाही तशीच आपल्यावर थेट येऊन आदळते, चक्रावते कधी ओळखीची कधी अनोळखी! विनोद, कारुण्य, दुःख, भयानकता, मृत्यू, फोलपणा... भावनांचा कल्लोळ उसळवत, विस्कटून टाकते. वेगळे अनुभवण्याची इच्छा असणा-या सर्वांनाच जिवंत अनुभव देणारी ही कादंबरी.
-
Tamil Tiger Prabhakaran (तमिळ टायगर प्रभाकरन)
श्रीलंकेतील तामिळींना स्वतंत्र राष्ट्र हवं - 'तमिळ इलम' यासाठी प्रभाकरनचा खटाटोप चालला होता. स्वत:चा स्वप्न त्यानं सर्व तमिळ बंडखोरांमध्ये संक्रमित केलं. या स्वप्नासाठी त्याच्या मृत्युपर्यंत जवळपास ७० हजार तम्नील नागरिकांना प्राण गमवावे लागले. 'जगभर अनेक स्वातंत्र्ययोद्ध्ये पराभूत झाले. त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं. जे जिंकले ते राष्ट्रानिर्माते ठरले. क्रांतिकारक झाले. श्रीलंकेच्या दृष्टीने प्रभाकरन दहशतवादी होता. देशद्रोही होता. देशद्रोह्याला जी शिक्षा द्यायची ती त्यांनी प्रभाकरनला दिली... ठार मारले. तो अपयशी झाला म्हणून लोक त्याला दहशतवादी म्हणतील. मात्र तो विजयी झाला असता तर त्याच्याकडे बघायची बघायची लोकांची दृष्टी बदलली असती.
-
Agresar (अग्रेसर)
अग्रेसर म्हणजे भाऊ पाध्ये यांनी काढलेला साठोत्तरी मुंबईची आंतरिक संरचना दाखवणारा विलक्षण एक्सरे आहे. बकाल चाळींपासून उच्चभ्रू वर्तुळांपर्यंतची सांस्कृतिक वस्तुस्थिती तिच्यातील गुंतागुंतीच्या पेचांसह भाऊ पाध्ये यांनी मार्मिकपणे टिपली आहे. वैजू हे या कादंबरीतील प्रमुख पात्र आहे. तिने स्वतः च्या आयुष्याचे केलेले कथन, वाचकाच्या आकलनाशी तिने मांडलेला लपंडाव, तिच्या संभाषिताचा अस्सलपणा या सर्व गोष्टी मराठी कादंबरीच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशा आहेत. दांभिकता, संधीसाधूपणा, स्वतः ची व इतरांची केलेली फसवणूक, होरपळ, आकांत, वस्तुनिष्ठा, व्यवहारीपणा अशा अनेक छटांसह समोर येणारी अग्रेसर वैजू मराठी कादंबरीमधील एक अपवादात्मक पात्र आहे.
-
Chirantanacha Gandha (चिरंतनाचा गंध)
'सोलेदाद' आणि 'आतंक' या दोन संग्रहांनंतरचा 'चिरंतनाचा गंध' हा विलास सारंग यांचा मराठीतील तिसरा कथासंग्रह. वर्तमानातील एकाकीपणा, आत्मदुरावा, असंगतता, व्यक्तीच्या मनातील अनाकलनीय काळोख, या सर्व गोष्टींचा वेध घेणारी सारंगांची कथा 'चिरंतनाचा गंध' मध्ये समूहापर्यंत पोहोचली आहे. अगोदरच्या खास आधुनिकवादी आशयसूत्रांमधील ताणतणाव या संग्रहातील कथांनी टिकवून ठेवले आहेतच; त्यांच्या बरोबरीने सारंगांच्या कथेमध्ये आता भूतकाळाला आणि सांस्कृतिक अर्थनिर्णयनाला कळीचे महत्व येऊ लागले आहे. 'चिरंतनाचा गंध' मधील कथांमध्ये आदिम मिथ्यकथा आणि वर्तमान परिस्थिती यांचे अद्भुत मिश्रण आहे. अस्तित्वाच्या कडेलोटापर्यंत येऊन पोहोचलेल्या नैतिकतेचा कस पाहणाऱ्या घटना आहेत. वास्तवापासून अतिवास्तवापर्यंतचे भव्य परिप्रेक्ष्य आहे. या सर्व घटकांना वेधून असणारी सारंगांची विलक्षण तीव्र, अंतर्भेदी अशी कल्पनाशक्तीही आहे. 'चिरंतनाचा गंध' यामुळेच लक्षणीय ठरतो. मराठी कथेला वेगळी परिमाणे देण्याची क्षमता या कथांमधून खात्रीने प्रत्ययाला येते.