-
Karanta (करंटा)
स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधः पतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या करंटा या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परीमानांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधील राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची मानुस्पनावरची नजर किंचीतशीही हटत नाही. -हरिश्चंद्र थोरात
-
Ganaryache Por ( गाणार्याचे पोर)
दिवंगत गायक भारतरत्न भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव राघवेंद्र जोशी यांनी लिहिलेले ' गाणार्याचे पोर ' बदामीतल्या त्या स्वतंत्र संसारातील सुखाच्या आठवणी येताच आई आपल्यातच हरवून जात असे. पहाटे उठून भीमण्णा नुसत्या खर्जाची मेहनत करत. एकदा चहा घेऊन ते रियाजाला बसले होते. घसा खाकरून खाकरूनही खर्ज (मंद्र सप्तकातला षड्ज) नीट लागला नव्हता. आईकडे दुसर्या चहाची मागणी झाली. बशीत ओतून दोनच घोट घेतले असतील-नसतील. बाहेर एक वासरू हंबरले. हातातली चहाची बशी खाली ठेवून भीमण्णांनी त्या हंबरण्यात आपला सूर मिळवला व आईला ओरडले- 'हा बघ खरा खर्ज!' बदामीत असतानाच एकदा भीमण्णा टायफॉईडने खूप आजारी पडले. गावातल्या डॉक्टरांनी सतत औषधोपचार केले. आईने अहोरात्र सेवा केली, म्हणून त्यातून ते वाचले. एके दिवशी तर ताप डोक्यात शिरून वात झाला. खडेमीठ घेऊन ते डोक्याला चोळले होते. आवाज पूर्ण गेला होता. दीड महिन्यानंतर एके दिवशी चहा पीत असताना भीमण्णांनी सूर लावला आणि आवाज बाहेर येताच आईला आनंदाने म्हणाले- 'नंदी माझा आवाज परत आला गं.' हळूहळू प्रकृती सुधारून परत गाणे सुरू झाले. माझ्या या स्वरभास्कर पित्याच्या आयुष्यात माझ्या आईने तिचे पत्नीचे कर्तव्यच जरी केले असले, तरी तिचे हे योगदान कधीच न पुसले जाणारे आहे. आपले ' कुंकू ' राखण्यासाठी तिने हे केले, तरी भविष्यातील ' भारतरत्न भीमसेन ' चा तो पुनर्जन्मच होता! त्याच सुमारास भीमण्णांच्या काकांनी, गोविंदकाकांनी एक कन्नड नाटक ' भाग्यश्री ' लिहिले व रामकाकांनी ते नाटक करायचे ठरविले. रामकाका स्वत उत्तम नट होते. नाटकात मुख्य भूमिका भीमण्णा करणार होते; पण स्त्रीपात्र कोण करणार हा प्रश्न होता. कर्नाटकात त्या काळी कोणीही स्त्री नाटकात काम करत नसे; पण इकडे औरंगाबादकडील ' वत्सला मुधोळकर ' या स्त्रीला भीमण्णा रेडिओ स्टेशनवरील भेटीमुळे ओळखत होते. गावोगावी मेळ्यांतून ' त्या ' मिळतील त्या भूमिका करत. अशा वेळी कोणाकडेही मुक्काम करण्याचा ' त्यां ' ना अनुभव होता. जालन्यातही गुरूगृही ' घरंदाज ' तालीम ' त्यां ' नी घेतल्याचे सर्वांना माहीत होते. त्यामुळे अजिबात कन्नड येत नसतानाही त्यामुळे ' त्यां ' ना धारवाडला बोलविले गेले. सतत नाटकाच्या तालमी व त्यातले ' संवाद ' समजावून सांगण्याच्या निमित्ताने ' त्यां ' चा भीमण्णांशी सहवास वाढत गेला. असल्या प्रकरणाचे रामकाकांनाही काहीच वावडे नव्हते. गंमत संपताच प्रकरण संपते, हा त्यांचा स्वतचा अनुभव! या नाटकाचे धारवाडला प्रयोग झालेच; पण पुण्या-मुंबईलाही झाले. प्रयोग थांबताच भीमण्णा परत बदामीला येऊन आपल्या संसारात-गाण्यात मग्न झाले... हे नाटकच ' सुनंदा ' च्या संसाराला आग लावेल, याची मात्र तेव्हा कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे आईला पुढेपुढे जेव्हा या गोष्टी आठवत, तेव्हा ती रामकाका व इतर जोश्यांच्या नावे एकेरीत शुद्ध सात्त्विक शिव्यांची लाखोली वाहे! अतोनात अन्याय भोगाव्या लागलेल्या त्या अबलेच्या हाती आणि काय होते? आई साधीच होती. ' त्या ' एक दिवस अचानक बदामीला आल्या व आईचे पाय धरून, 'मी केवळ गाणे शिकण्यासाठीच आले आहे व ' भीमण्णां ' ची शिष्या म्हणून राहीन' असे वचन आईला दिले. येथेच आई गाफील राहिली. माझा व उषाचा तोपर्यंत जन्मही झालेला होता व आईला परत दिवस राहिले होते. त्यामुळे आईने हो म्हटले. आईच्याच थोरल्या बहिणीच्या वाड्यात ' त्या ' भाड्याने खोली घेऊन राहू लागल्या. वेळेला आई किंवा माझी मावसबहीण सुधा ' त्यां ' ना जेवणही पाठवी. दिवस भरून आईने सुमंगलाला जन्म दिला. दीड-दोन महिने गेले आणि एक दिवस मात्र उगवला तो, आईच्या आयुष्यातला काळाकुट्ट दिवस! सकाळी भीमण्णा अंथरुणात नव्हते. नीट पाहिल्यावर आईला आपली पत्र्याची ट्रंकही उघडी दिसली. आता येतील, मग येतील म्हणून आईने स्वयंपाक केला; पण यांचा पत्ता नाही. तेवढ्यात आईची भाची सुधा पळत आली आणि ' त्यां ' चाही पत्ता नाही, म्हणाली. आईने पत्र्याची ट्रंक तपासली, तर त्यातली आईची सोन्याची साखळी गायब झाली होती. पुढे नागपूरला रेडिओवर गाणे होते, हे भीमण्णा मित्राजवळ बोलल्याचे व ते तिकडेच गेल्याचे आईला कळले. आईचे बाळंतपण ' त्यां ' च्या पथ्यावर पडले होते. कसलाही माहेरचा व सासरचा आधार नसलेली माझी आई दु:खाने व फसवणुकीने गर्भगळित झाली. आईने सांगितल्याप्रमाणे तिला आमच्या घराण्याचे गुरू स्वामी-राघवेंद्रस्वामी यांनी आतूनच जाणीव दिली की- 'काहीही झाले तरी नवर्याची पाठ सोडू नकोस. संसाराच्या गाडीचे एक चाक निसटले आहे; पण तू कच खाऊ नकोस!' स्वामींचा तो आदेश मानूनच अगोदर आई-सुमंगला नागपूरला गेले. नंतर मी व उषा, आम्हाला घेऊन जाण्यास गदगला आलेल्या भीमण्णांबरोबर १९५१ च्या सुमारास नागपूरला जाऊन पोहोचलो. २४-२५वर्षांची तरणीताठी सुंदर बायको व पदरी तीन मुले, हे नागपूरकरांनी पाहताच प्रतिष्ठित लोकांत हे जमणारे नाही, म्हणून ' त्या ' व भीमण्णा पुण्याला आले. (ज्या श्रीमंत बाबुराव देशमुखांची ' भीमसेन ' पुस्तकात ' त्यां ' च्या लग्नाची साक्ष सांगितली गेली आहे, तेच भीमण्णांना रागावले व त्यांनी त्यांना चांगलेच खडसावले होते.) 'पहिली बायको वेडी आहे!' असे ' त्यां ' च्याकडून अगोदर सांगितले गेले होते; पण प्रत्यक्ष आई व आम्हाला पाहताच तो बार पोकळ गेला. तेथे विवाह केला, असे नंतर छापून आणले गेले. लग्नाचा खोटा प्रचार करण्याचे गोबेल्सचे तंत्र सर्वकाळ वापरले गेले; पण सत्य वेगळेच होते. आईच्याच ' सोन्याच्या साखळी ' चे रूपांतर ' मंगळसूत्रा ' त झाले होते व सत्यनारायण करून ते गळ्यात घातले गेले होते. नागपूरमधील वास्तव्य मला पूर्णपणे स्मरणात आहे. शुक्रवार तलावाजवळ ठाकुरांच्या वाड्यात आम्ही भाडेकरू होतो. ते नवरा-बायको आम्हावर अतोनात प्रेम करत व आईला मानसिक आधार देत. वाड्याच्या मालकीणबाई जनाताई ठाकुरांनी तर आम्हा भावंडांना लळाच लावला होता. नागपूरचा तो जीवघेणा उन्हाळा, रात्रीच्या गच्चीवरील ' अंगत-पंगती ' नंतर खाल्लेली ' दही-साखर ', जनाताईंबरोबर लग्नाला जाऊन खाल्लेला ' भजी-भात ', सर्व स्वच्छ आठवते. श्रीमंत बाबुराव देशमुखांकडे बैलपोळ्याला गेलो असताना चांदीच्या ताटात ' पेशवाई ' थाटाने केलेले जेवण व त्यांच्या शेतावर जाऊन झोडलेली हुर्डा-पार्टीही चांगलीच लक्षात आहे! जेमतेम वर्षभराच्या मुक्कामानंतर आम्ही पुण्याला निघालो. माझी पहिलीची परीक्षा संपताच माझा व्यंकणकाका आम्हाला पुण्याला न्यायला आला. दोन-तीन दिवस ही सामानाची बांधाबांध चालू असताना आई मात्र उदास होती. मध्येच डोळ्यांतून टिपे गाळायची. बदामीहून नागपूरला येताच बसलेल्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरत इथल्या वातावरणात थोडी स्थिरावली होती. जनाताईंनी जी माणुसकी दाखवली, प्रेम दिले व जो जिव्हाळा दाखवला, त्यामुळे तिला सारखे भरून येत होते! माझे शाळेतले मित्रही घरी सारख्या चकरा मारून जात होते. जिवलग मित्र दिलीप बडवेशी परत भेटण्याच्या आणाभाकाही रडत रडत घेऊन झाल्या. निघायचा दिवस उजाडला. आम्ही सर्वांच्या पाया पडलो. आईचा, जनाताई आणि ठाकुरांसमोर वाकताना मात्र बांध फुटला. ती रडू लागली. 'जनाताई, काय होणार माझ्या पोराबाळांचे? तुम्हीच सांगा की हो! आता मला कोणाचा आधार?', आई. 'सुनंदा स्वतला आवर! रडू नकोस. सोन्यासारख्या पोरांकडे बघ. काळजी करू नकोस, देव तुझ्या पाठीशी आहे.' असे म्हणत जनाताईंनी आईला कवेत घेतले व हळूच एक नोट तिच्या हाती कोंबली. 'चला गाडीला उशीर होतो आहे!' व्यंकणकाका म्हणाला. परत एकदा सर्व घर भरल्या डोळ्यांनी पाहून घेतले व बाहेर पडलो. बाहेर टांगा उभाच होता. आयुष्यात परत नागपूरला जाण्याची वेळ आली नाही; पण ' नागपूर ' नाव येताच मात्र काळ्या-सावळ्या जनाताई व त्यांचे रांगडे पती, भाबडे हसू घेऊन माझ्यासमोर उभे राहतात! आयुष्यभर आईला त्यांच्या रूपात भेटलेले ' विठोबा-रखुमाईच ' आठवून जातात.
-
Sarv Prashna Anivarya
‘निशाणी डावा अंगठा’ ही उत्रादकरांची पहिली कादंबरी बरीच गाजली होती. तिच्यावर चित्रपटही आला. 'सर्व प्रश्न अनिवार्य' या कादंबरीचा विषयही ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था हाच आहे. केवळ शिक्षणव्यवस्थेत-परीक्षा पद्धतीतच नाही तर आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जगण्यात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचा वेध या कादंबरीत घेण्यात आला आहे.
-
Yahi Hai Rangroop
सलीम खान, शमशाद बेगम, बी. आर.इशारा. नंदा, राजेंद्रनाथ, बसू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ती. या सरार्वांमध्ये मला एक समानता आढळून आले की सातही जण मनस्वी आणि स्वत:शी खूप प्रमाणिक आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आगीतून पारखून निघालेलं. असं म्हणतात की हिरा कितीही जुना झाला तरी त्याचं तेज झोकाळत नाही. ही व्यक्तिमत्वंही तशीच आहेत. वाचकांनासुद्धा ती भोवतील अशीच आशा आहे.