Dairy (डायरी)
प्रवीण बर्दापुरकरांनी गेल्या तीस वर्षात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उलथापालथी पाहिल्या आहेत. हा काळच प्रचंड उलथापालथींचा आहे. त्यातील अनेक नायक-खलनायक वा प्रतिनायक-उपनायक प्रवीणना भेटले आहेत. काहीजण कुणीच नव्हते तेव्हा आणि पुढे स्वयंभू नायक- महानायक झाल्यावर. प्रवीण यांनी त्यांच्या त्या प्रवासाची मानसिक नोंद केली आहे आणि अर्वाचीन इतिहासात त्यांचे कोंदण कोणते ते ठरवून ती 'जागा' त्यांना दिली आहे. विशेष म्हणजे, प्रवीणच्या डायरीत आत्मप्रौढी नाही वा आत्मकरुणा नाही, आत्मवंचना नाही आणि कुठचा गंडही नाही. यामुळे या लेखनाला एकसहजता, एक तात्कालिक ऐतिहासिकता आणि एक प्रवाहीपणा प्राप्त झाला आहे. ही 'डायरी' प्रत्येक 'होतकरू' पत्रकारानेवाचावीच, मात्र तिचा परिसर पत्रकारितेच्या पलीकडे, म्हणजे आपल्या व्यापक सामाजिक राजकीयतेकडे आहे आणि म्हणूनच सर्वच प्रकारच्या वाचकांच्या मनोकक्षा रुंदावणारा आहे.