Lajja (लज्जा)
लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांची कन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता.