Marathi Riyasat (Punyashlok Shahu,Peshwa Balaji Vi
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.