Aakalan Ani Aakshep (आकलन आणि आक्षेप)
साहित्यकृतीचे आकलन सामाजिक-सांस्कृतिक संदर्भाशिवाय होऊ शकत नाही आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण समजून घेतल्याशिवाय साहित्यकृतींचे मूल्यमापन होऊ शकत नाही,हे भान 'आकलन आणि आक्षेप' या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये आढळते. साहित्य हे समाजजीवनाला वळण लावणारी शक्ती असते,आणि साहित्य हि सामाजिक जीवनव्यवहाराची निष्पतीही असते.साहित्य सामाजिक कारणांचा परिणाम असते. आणि साहित्य हेच सामाजिक परिणामांचे कारणही असते. साहित्य हे सामाजिक अंतःस्वत्वांचे निर्देशकही असते. समाजाच्या विचाराने आणि प्रेरणांतून साहित्य निर्माण होते;समाजाला विचार आणि प्रेरणा साहित्य देतही असते. साहित्य आणि समाज यांच्यातील अनुबंधाचा जेव्हा साहित्यकृतीला विसर पडतो,तेव्हा पोटतिडीकीने आक्षेप नोंदविण्याचे कार्य या पुस्तकातील लेखनातून केले गेले. सांस्कृतिक संदर्भाची वीण सूक्ष्मपणे उकलून, आशयद्रव्य तळामुळातून ढवळून काढून आकलनाचे प्रश्न सोडवणे आणि निःपक्षपणे व तर्कशुद्धपणे मूल्यमापन करून धीटपणे आक्षेप नोंदविणे हे या पुस्तकातील लेखनाचे सामर्थ्य होय.