Kavadase (कवडसे)
सावंतसाहेबांनी उभ्या केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तिरेखा म्हणजे पुराणातली वांगी नसतात, तर २१व्या शतकाशी त्यांचा सांधा असा जुळलेला असतो की कित्येक वाचक त्यातून जीवनदायी प्रेरणा घेतात. ह्या लेखसंग्रहातही सावंतसाहेबांची ही वैशिष्ट्यं तर मला जाणवलीच; पण समकालीन लेखकांच्या लेखनाचं मोकळेपणानं कौतुक करण्याचा त्यांच्या मनाचा खुलेपणाही मला जाणवला. ते माणसातली विकृती शोधत नाहीत— शोधतात त्याला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श— मग तो भक्तीचा असेल, प्रतिभेचा असेल किंवा सामाजिक कणवेचा असेल. सावंतसाहेबांच्या महाकादंबऱ्यांत तर त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य वाचकाला भारावून टाकणारंच असतं; पण ह्या छोट्या छोट्या लेखांतील तेज:पुंजांचं महत्त्वही मला कमी वाटलं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिभासूर्यानं वाचकांना दिपवून टाकलं; पण ह्या लेखसंग्रहातही त्यांच्या प्रतिभासूर्याचे विविध आकारांचे कवडसेसुद्धा वाचकाला एक वेगळाच आनंद मिळवून देतील याबद्दल शंका नाही.