Sukhacha Lapandav (सुखाचा लपंडाव)
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर यांची ‘सुखाचा लपंडाव’ ही कादंबरी प्रेमत्रिकोनाची शोकांतिका म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे. डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने संघकार्यात निष्ठेने भाग घेणारा सुखवस्तू व सुशिक्षित तरुण कुमार आणि चारचौघींसारखी दिसणारी, सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशील, सुस्वभावी कॉलेजयुवती पुष्पमाला तसेच गौर वर्णाचे, बंगाली वाटावेत असे सालस युवक डॉ. सतीश या तिघांची ही प्रेमकहाणी आहे. प्रवासादरम्यान संकटातून सोडवणारा कुमार पुष्पमालेला आपलासा वाटतो; परंतु कुमारची आधीपासूनची मैत्रीण माधुरीसाठी त्याच्या प्रेमाला पुष्पमालेनं नकार दिला; त्यामुळे त्याची दारुण निराशा होऊन तो एकाएकी नाहीसा झाला होता. तसेच तिच्यावर मनापासून प्रेम करणाNया डॉ. सतीशनांही (त्यांच्याविषयी आपल्या मनात केवळ आदरभाव आहे, असे सांगून) त्यांच्याबरोबर जाण्यास पुष्पमालेनं नकार दिला होता; त्यामुळे ते निराश होऊन व्यसनाच्या आहारी गेले होते. अर्थात कादंबरीची नायिका पुष्पमालेनं हे सारं दुःख स्वतःवर बुद्धिपुरस्सर ओढवून घेतलं होतं. आयुष्यात पुढे जे जे दुःखोपभोग तिच्या वाट्याला आले, त्याचं बीज तिच्या आणि कुमारच्या पहिल्या भेटीतच रोवलं गेलं होतं. यापुढील कथा तर आणखी हृदयद्रावक आहे. अचानक नाहीसा झालेला कुमार सैन्यात भरती होतो आणि युद्धात मारला जातो तर विवाहित स्त्रीला पूÂस लावून पळवल्याच्या आरोपावरून डॉ. सतीश यांना तुरुंगवास भोगावा लागतो. अर्थात पोलीस अधिकारी दादासाहेब यांनीच सूडभावनेनं डॉक्टरांविरुद्ध हा बनाव घडवून आणलेला असतो, कारण त्यांची मुलगी अचला हिच्या प्रेमाला डॉ. सतीश यांनी नकार दिलेला असतो. या सर्व घटना-प्रसंगांबद्दल विचार करताना पुष्पमालेला असं वाटू लागतं की, ‘या साNया अनर्थाला मुळात मीच कारणीभूत आहे. हाताशी आलेलं सुख गमावण्यात आपण वेडेपणा तर केला नाही? खोट्या अभिमानाला बळी पडून आपण आत्मवंचना तर केली नाही? असे प्रश्नही तिच्या मनात येतात. तीन वर्षांच्या अवधीत कित्येक वेळा खोट्या अभिमानाला बळी पडून हाती आलेलं सुख मी स्वतःहून दूर लोटलेलं आहे. मला आयुष्यात सुख लाभण्याऐवजी माझी आणि सुखाची वारंवार फारकतच होत गेली. जणू काही सुखाचा आणि माझा लपंडावच चालू आहे.’ अर्थात ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे या कादंबरीतील घटना-प्रसंगांना स्वातंत्र्यपूर्व काळाची पाश्र्वभूमी आहे; त्यामुळे काही राष्ट्रीय चळवळी आणि राष्ट्रीय आपत्ती यांचा प्रासंगिक कथानकात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. खेर यांची लेखनशैली सोपी व सुबोध आहे. भवितव्यतेचा खेळ म्हणून आदी आणि अंत विविध प्रकारची वळणे घेत असतानासुद्धा एकाच वर्णनात बसतील असे जुळवले आहेत. कादंबरी वाचताना अगदी अखेरपर्यंत मनोरंजन होत राहाते. मात्र, या कलाकृतीचा परिणाम वाचकाला जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा गंभीरपणे विचार करावयास लावणारा आहे.