Lokmanaya Tilak Darshan (लोकमान्य टिळक दर्शन)
`लो. टिळक दर्शन’ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं चरित्र आहे. प्राधान्याने टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांतून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या चरित्रातून घेतला आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीच्या आधारे स्वातंत्र्य मिळविण्याचं आवाहन टिळकांनी जनतेला केलं आणि ती चतु:सूत्री राबवण्यासाठी ते सक्रिय झाले ते शेवटपर्यंत. या पुस्तकात टिळकांनी केलेली होमरूल चळवळ, मवाळ पक्षाशी त्यांचा झालेला सघर्ष, त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अग्रलेख, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, विविध सभांमध्ये त्यांनी घेतलेला भाग, त्यांनी वेळोवेळी जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांचे गाजलेले वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण, त्यांना वेळोवेळी घडलेले तुरुंगवास, मंडालेची काळ्या पाण्याची शिक्षा, रँडच्या खून खटल्यात त्यांना गोवण्याचा झालेला प्रयत्न, टिळकांनी इंग्रज सरकारवर भरलेला अब्रूनुकसानीचा खटला, त्यामुळे त्यांना झालेला मनस्ताप आणि सोसावा लागलेला आर्थिक भुर्दंड, त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत केलेली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसनची स्थापना आणि नंतर केवळ तत्त्वासाठी त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा, राजकीय जीवनात टिळकांना लाभलेले अनुयायी, टिळकांची लोकप्रियता, त्यांच्या विचारांनी क्रांतिकारकांना पुरविलेलं बळ आणि जनतेत पसरलेलं चैतन्य, मुस्लिम समाजाबद्दल त्यांना वाटणारी आस्था इ. अनेक मुद्दे, घटना, प्रसंग अधोरेखित करण्यात आले आहेत, ज्यातून टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचं आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचं यथार्थ दर्शन घडतं. योगी अरविंद, मंडालेच्या तुरुंगात त्यांना स्वयंपाक करून जेवायला घालणारा कुलकर्णी इ. लोकांनी टिळकांबद्दल लिहून ठेवलं आहे.