Bakhar Lalitadityachi (बखर ललितादित्याची)
काश्मीरनरेश ललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवास आठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्याएवढा प्रभाव टाकणारा सम्राट झाला नाही, हे एक वास्तव आहे. ललितादित्याचे समग्र जीवन मुळातच एवढे झंझावाती आणि साहसी आहे की, लेखिकेला ते कादंबरीरूपात मांडावेसे वाटले. या कादंबरीच्या रूपाने ललितादित्याची तेजाने झळाळणारी जीवनगाथा आपल्यासमोर आली आहे. दोन स्तरांवर कादंबरी पुढे नेण्याचे आणि तिला अजून थरारक बनवण्याचे कौशल्य डॉ. लिली जोशी यांनी दाखवलेले आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयताही वाढलेली आहे. ललितादित्याच्या जीवनाची नाळ वर्तमानाशी भिडवण्याचे लेखिकेचे कौशल्य उत्कृष्ट कादंबरीकाराचे गुण त्यांच्यात आहेत, याचे निदर्शक आहे. या कादंबरीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या, पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ललितादित्य या महान सम्राटाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि अभिनंदनास्पद कार्य डॉ. लिली जोशी यांच्याकडून पार पडले आहे. बहुतेक सर्वच मराठी कादंबरीकार मराठी इतिहासातील महानायकांच्या प्रभावक्षेत्रात वावरत असताना त्यांनी थेट काश्मीरच्या इतिहासाकडे झेप घेतली आणि एक दुर्लक्षित, पण गौरवास्पद इतिहासाला वाचा फोडली, हे त्यांचे साहित्यकार्य राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र आहे. संजय सोनवणी (प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक)