Anhad (अनहद)

By (author) Nirmohi Phadke Publisher Granthali

अनहद' हा मनातील निःशब्द शांततेला शब्दांत उतरविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण ललितघाट. चिमुकल्या काळातील हा हृदयसंवाद आहे. 'तो' आणि 'ती' यांच्याबरोबरच 'स्व'शी तसेच सृष्टिविषयीची ही अनावर अशी संवादरूपे आहेत. या लेखनविश्वात प्रत्यक्षातल्या जगापेक्षा एका वेगळ्या जगाची खेच आहे. ते जग म्हणजे भूतकाळ, आदिमता आणि अमूर्ताचे जग. प्रत्यक्षातले जग हे मानवी अस्तित्व छाटणारे जग आहे. या जगात आणि स्वप्नसृष्टीत ताणतणाव आहेत. त्यामुळे भोवतालच्या जगाला म्यूट करून विहिरीतळातील जिवंत झऱ्यांच्या सृष्टीबद्दलचा जिव्हाळाभाव त्यामधून प्रकटला आहे. त्याच्या जोडीला चंद्र चांदवा, चांदणं, चांदुकली, जलदेवता आणि झाडफुलांच्या मोहमायारूपी ऋतुचक्राच्या नांदवणुकीचे भरगच्च संदर्भ आहेत. एका अर्थाने या जगात झेपविसावा आहे. टेकडीबाईच्या त्रिकोणाची हवीहवीशी नजर आणि अनेक 'हाकां'चे ध्वनी - प्रतिध्वनी आहेत. याबरोबरच काव्यनिर्मितीची अनामिक हुरहुर आणि त्या तरुतळी विसरलेल्या गीतांचा आठव आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात खास भारतीयत्वाचे संदर्भ आहेत. त्यामुळेच आभाळओल्या हळदकुंकवाच्या ओढीचा स्त्रीचिंतनाचा पैस त्यास लाभला आहे. स्वप्नील जगाबरोबर काही प्रमाणात गतकातरता, रोमँटिकतेच्या आकर्षणाबरोबरच सहजसंवादी सलगीची भाषा, काव्यात्मता, चिंतनशीलता, दृश्य रंगसंवेदनांचे घनदाट प्राचुर्य, संगीतादिचित्रांचे संदर्भ, हिंदी-उर्दूतील मिठीजुबान आणि मोहक शब्दकळेचे आकर्षण ही या गद्याची वैशिष्ट्ये होत. भाषेतील पद्मनादमेळाचे विलक्षण आकर्षण या गद्यशैलीस आहे. त्यामुळे, या ललितगद्यास खुल्या प्रसरणशील ललितगद्याचा घाट प्राप्त झाला आहे. 'अनहद' नादाचे प्रतिध्वनी वाचकांना बहुमुखी अर्थवलयांचा नक्कीच भरगच्च प्रत्यय देतील. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे

Book Details

ADD TO BAG