Mu.Po.Vadache Mhasve Te U.S.A (मु.पो.वडाचे म्हसवे ते यु. एस.ए)
आनंद म्हसवेकरांचे हे आत्मचरित्र वाचताना, ही एका दलिताची दर्दभरी कहाणी आहे, किंवा त्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारी रडकथा आहे, असे मुळीच वाटत नाही. हे ओघाने येणारे एक जाज्वल्य सत्य आहे, जे जीवनाकडे अत्यंत सहजतेने पाहून समाजाला दोषी न ठरवता त्यातून आपण आपली वाट कशी काढावी याची एक समंजस लढाई आहे. आत्मचरित्र लिहिण्याचे आनंदचे खरेच वय झालेय का, असा प्रश्न पडतो. पण, सत्तरी पार केलेल्या या लेखकाचे वय आकड्यात मोजण्यापेक्षा अनुभवात मोजले की या प्रश्नाचे उत्तर सापडेल. त्याचे उत्तर कदाचित असेही असेल, की आनंदसारखे लेखक हे आजच्या काळातले नाहीत, तर अनादि काळापासून जगताहेत, जगण्याच्या मूलभूत सोयींसाठी झगडताहेत, त्यांची ही धडपड अशा आत्मचरित्रातून वाचा फोडते, तिला आक्रोश न समजता, गणितात हुशार असलेल्या एका गणितज्ञाने आपल्या 'जीवनाचे गणित' किती शांतपणे सोडवले आणि आपल्या कुटुंबाला कशाची झळ न पोचवता, एका समृद्धीच्या वाटेवर आणून सोडले, त्याची ही सुफळ संपूर्ण कर्मकहाणी, म्हणून हे आत्मचरित्र वाचावे ही सदिच्छा. हृषीदांच्या 'आनंद' या चित्रपटात एक वाक्य आहे. 'बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं...' आनंद म्हसवेकरांचे हे आत्मचरित्र आयुष्याच्या अनेक झगड्यांनी भरलेले असले, तरी ते मैलोन्मैल पसरलेले नसून उंचच उंच आहे. अगदी 'आनंद' म्हणतो तसे...