-
Pakshyanchi Sabha (पक्ष्यांची सभा)
पर्शियन भाषेतील ह्या महाकाव्याविषयी आपल्या देशात फारच कमी लोकांना ठाऊक असावे. मंतिक-उत-तैर ह्या फरीदुद्दिन अत्तार साहेबांच्या लिखाणातील सुफी भाष्य अतिशय काळजीपूर्वक गर्भित अर्थासह समजून घेतले तर हा ग्रंथ जणू जीवन जगण्याचे आगळे तत्वज्ञानच सांगतो. सत्याच्या शोधात झेपावलेले निरागस पक्षी व त्यांचा गुरू ही संकल्पनाच भन्नाट आहे. प्रेम हा सुफी पंथाचा आत्मा आहे. हे पक्षी आपल्या मनाचे भलेबुरे कंगोरे स्वत: मांडतात व त्यांचा गुरूरूपी पक्षी हुपी त्यांना त्यामधील निरर्थकता पटवून देतो. छोट्या रूपक कथांमधून प्रवास करता करता ते सात जीवघेण्या दऱ्या पार करून जातात. हा प्रवास विलक्षण व अदभुत आहे. मूळ पुस्तक पर्शियन व उर्दू भाषेत असल्यामुळे ते भारतात उपयोगी ठरायचे नाही अशा गैरसमजुतीमुळे कदाचित आतापर्यत त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. म्हणूनच या मौलिक ग्रंथाची ओळख जास्तीत जास्त वाचकांना लवकरात लवकर होणे ही काळाची गरज आहे. हे भाषांतर नसून स्वैर अनुवाद आहे व सौ. अंजली खिस्ती ह्यांनी मूळ रचनेला व संकल्पनेला कोणताही धक्का न लावता स्वतंत्रपणे प्रभावीपणे ते सोप्या मराठीत आणले आहे.
-
Kalkallol (कालकल्लोळ)
'कालकल्लोळ' हा अरुण खोपकर यांच्या विविध कलाविचारांचा 'अनुनाद' नंतरचा टप्पा आहे. 'विस्तारणारी वर्तुळे'तल्या लेखांत बहुरंगी घटनांचा, स्थळांचा व व्यक्तींचा एक पट मांडला आहे. साठोत्तरीच्या मुंबईपासून उलगडता उलगडता, तो सत्तरीच्या कसौलीतल्या राष्ट्रीय कलासंगमातून, ऐंशीच्या पॅरिसमधल्या 'फेस्टिव्हल ऑफ इंडिया'पर्यंत पोचतो. यात अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, दिलीप पाडगावकर, आर.के.लक्ष्मण, नाटकवाले, संगीतकार, नर्तक, संतमहंत, विचारवंत आणि विक्षिप्त अशा अनेकांची हृद्य शब्दचित्रे आहेत. मुंबईच्या बेकायदेशीर दारूगुत्यांपासून पॅरिसच्या बिस्त्रोपर्यंतची चित्रविचित्र स्थळचित्रे आहेत. खोपकरांच्या विस्तारित होणाऱ्या कलाजाणिवांशी आणि ज्ञानकक्षांशी संबंधित असलेल्या या लेखनात, समकालीन सांस्कृतिक इतिहासाच्या खाणाखुणाही प्रभावीपणे प्रकटलेल्या आहेत. 'तीन किरणकेंद्रे'तल्या पहिल्या लेखात आपल्या 'अधोनाट्य-नाट्य-ऊर्ध्वनाट्य' या नवसंकल्पनेच्या आधारे खोपकर सतीश आळेकरांच्या नाटकांकडे पाहतात. दुसऱ्यात 'संत तुकाराम' या 'प्रभात'च्या कालजयी चित्रपटाची सोदाहरण उकल करतात. तिसऱ्यात ते अरुण कोलटकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतात आणि साहित्यसमीक्षेला अनोख्या असलेल्या दृष्टिकोनांतून, आतापर्यंत न जाणवलेली काव्यवैशिष्ट्ये नजरेसमोर आणतात. अंतरंगातून खळाळून वाहणारा भाषेचा व समृद्ध विचारांचा प्रवाह या सर्व लेखांना जोडतो. खोपकर हे चित्रपट, साहित्य, संगीत, चित्रकला, स्थापत्यकला, लोककला इत्यादींचे, अनेक भाषांचे व संस्कृतीचे, मर्मज्ञ जाणकार आहेत, सहज संवादी भाषा आणि अधूनमधून येणाऱ्या अंतःस्फूर्त भाष्यांमुळे हे पुस्तक आधीच्या 'अनुनाद' या पुस्तकाप्रमाणेच वाचनाची आंतरिक सक्ती करणारे ठरावे.