-
Drohparv ( द्रोहपर्व )
इ.स. १७७३ ते १७७९ शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा... रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ... निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया.... सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात... संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र... ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट... इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत - ’वडगावच्या लढाई’त - इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाता! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी.
-
Maharshi Te Gauri ( महर्षी ते गौरी )
समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुद्धपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या गौरी देशपांडे! ' या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढ्या स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल, तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तींचा इतिहासच आहेत.
-
Brush Mileage ( ब्रश मायलेज )
एका चित्रकरांची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे … रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतनं आपल्या जडण- घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे… कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकांनं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे...
-
Chinmadhala Dr. Jinduo
१९४९ साली चीनमध्ये साम्यवादाची राज्यपद्धती आली. तेव्हापासून चिनी जनतेने फार सोसलंय. साम्यवादाच्या बगलेत पडलेला दहशतवाद भोगलाय. कॉम्रेड्सच्या त्या राज्यात ’जगत राहणे’ म्हणजेही कोणते दिव्य, याची खबर जगाला पोहोचू न देण्याची दक्षता तिथल्या राज्यकर्त्यांनी पुरेपूर घेतली होती. चीनला प्रत्यक्ष भेट देऊन बांबूच्या पडद्याआडचा दहशतवाद कादंबरीरूपात आणणारी ही साहित्यकृती. लेखिका म्हणते, ’आपल्याहाती असलेल्या लोकशाहीच्या ठेव्याची जाणीव व्हावी; लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका, न्यायालयात दाद मिळण्याची सोय, कुणावरही जाहीर टीका करण्याचा परवाना, अशा सोयीस्कर समजुतीत बेपर्वा वागणार्या आपले डोळे उघडावेत, म्हणून ही लिहिली.’ स्वातंत्र्य मिळताच ’लोकशाही’ ऐवजी ’साम्यवाद’ आपल्या कपाळी आला असता तर...?
-
Meera Aani Mahatma (मीरा आणि महात्मा)
मॅडलिन स्लेड. ती होती एका ब्रिटिश अॅडमिरलची मुलगी. रोमा रोलाँ या फ्रेंच साहित्यिकाची मानसकन्या. तिनं वाचलं एक चरित्र, रोमा रोलाँनी लिहिलेलं. महात्मा गांधींचं ते चरित्र वाचून ती भारावून गेली. इतकी की, तिनं उभं आयुष्यच गांधीजींच्या चरणी वाहायचा निर्णय घेतला. महात्माजींनी तिच्या समर्पणभावनेला प्रतिसाद दिला. तिला आश्रमवासिनी व्हायला संमती दिली. तिचं नाव बदललं, ’मीरा’ ठेवलं. त्या दोघांमध्ये विकसित झाले हळवे भावबंध. ते कधी वादळी ठरले, तर कधी हुरहूर लावणारे. त्या जगावेगळ्या नातेसंबंधांची आगळ्या शैलीत सांगितलेली प्रभावी भावकथा.
-
Kahani Londonchya Aajibainchi
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
-
Mahanayak (महानायक )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
-
नाझी भस्मासुराचा उदयास्त
जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न नव्हते, निवारा नव्हता, सर्वत्र पडलेली घरे होती. चिंध्या पांघरून अर्धपोटी अवस्थेत पुढचा हिवाळा जनतेला काकडत काढवा लागणार होता. पुढे फक्त अंधार होता, भीषण अंधार. मृत्यू-दरीसारखा. तिसरे राईश इतिहासजमा झाले होते. या तिसर्या राईशच्या उदयास्ताची कहाणी.
-
Openhaimar (ओपेनहायमर)
तो होता एक यशस्वी वैज्ञानिक. अणुबाँबच्या निर्मितीत त्याने हिरीरीने भाग घेतला, पण हायड्रोजनबाँबच्या निर्मितीला मात्र विरोध दर्शवला...मग राजसत्तेने त्याला शत्रू मानले, सरकारने त्याला जवळजवळ आयुष्यातूनच उठवले...जे. रॉबर्ट ओपेनहायमर त्याचे नाव! तरल कल्पनाशक्ती आणि विकृत वासना,लौकिक संपन्नता आणि मानसिक विषण्णता...अशा अनेक विरोधाभासांचा धनी ठरलेल्या एका लोकविलक्षण माणसाची, त्याच्या गुणदोषांची, त्याच्या सुखदु:खांची ही शोकात्म संघर्षकथा.
-
Pangira
पांढरी या गावाच्या बदलत्या मातीची कर्मकथा म्हणजे ’पांगिरा’. माणसांचं सामुदायिक आयुष्य आणि त्यातला चढउतार हीच या कादंबरीतली प्रधान पात्रं. ’गाव’च त्याचा नायक! लोकशाहीच्या प्रयोगासाठी संस्थानं खालसा झाली. कूळकायदा आला. वतनं गेली. दलालांच्या कुर्हाडी जंगलांच्या मानगुटींवर बसल्या. भूगर्भातलं पाणी संपलं. पिकं नाहीशी झाली. दुष्काळानं गावंच्या गावं गिळली. आणि लोकशाहीतून नवी घराणी जन्माला आली. कायदे आले. परंतु कायद्यातल्या फटी नेमक्या शोधून हव्या तशा वाटा वळवण्याचं नवं शासनही व्यवहाररूढ झालं. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहेगावशिवेच्या सत्तास्पर्धेचं, पर्यावरणाच्या परवडीचं, सामान्य कष्टकर्याच्या हलाखीचं चित्र. दिवसेंदिवस अधिकच भयाण, भेसूर बनत चाललेलं.