-
Hidden Measurement (हिडन मेजरमेंट)
'हिडन मेजरमेंट' या कादंबरीत धरणाच्या निर्मितीची, धरणग्रस्तांची आणि धरणाच्या निर्मितीनंतर आकाराला आलेल्या नव्या समाजव्यवस्थेची कथा आहे. आर्थिक सुबत्तेची, त्या सुबत्तेमुळे आलेल्या नैतिक अधःपतनाची मांडणी गोविंद काळे करतात. तसेच धरणग्रस्ताच्या घरातील तरुणाने उभारलेल्या संसाराची कथा या कादंबरीत आलेली आहे. या कादंबरीतील अनुभवविश्व नवे, अनोखे आहे आणि गोविंद काळे त्या अनुभवाला साध्या, सोप्या ग्रामीण भाषेचा साज चढवून आकर्षक रूप देतात. त्यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. इतकेच नाही, तर मराठी कादंबरीच्या प्रांतात या कादंबरीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
Arjunacha Putra Abhimanyu (अर्जुनाचा पुत्र अभिमन्य
अभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेंगाळणारे व्यक्तिमत्त्व! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी बीरभूमी! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा चंद्रमौली अतिशय घडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला! माहित असलेली कथा, लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहृदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते
-
Hurda (हुरडा)
ही जी घटना घडली तिला कोण जबाबदार? ज्यांनी कोवळ्या मुलींवर अत्याचार केला, बलात्कार व खून केला, ते ? की त्यांचे आई - वडील? ज्यांनी त्यांना वेळेत आवरले नाही, पाठीशी घातले ते? हा दोष कोणाचा? ज्या न्यायदेवतेकडून न्यायाच्या अपेक्षा असूनही न्याय मिळाला नाही ती? त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही म्हणून जनतेने कायदा हातात घेऊन जनतेच्या दरबारात त्यांनी न्याय दिला ते दोषी ? ते बरोबर की, हे याचा फैसला कोण करणार? याचा फैसला काळच करणार. कारण पुढील काळात असा गुन्हा करणारे दहा वेळा या घटनेचा विचार करतील. संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना बातमीच्या रूपाने पसरली. लोकांना वाईट वाटले नाही. जनतेने शेवटी न्याय केला. जनतेच्या दरबारात जे काय होते ते नेहमी लोकांनी स्वीकारले आहे.
-
Tumcha Aamcha Sanju (तुमचा आमचा संजू)
"संजू, आजच्या पराभवाला उद्याच्या जिंकण्यात बदलायचं. एकदा मनाशी जिद्द बाळगली की ते अवघड नाही. आपल्या मर्यादा आणि आपलं बलस्थान ओळखण्यासाठी या परीक्षा असतात. मर्यादांना अधिक सक्षम करायचं आणि त्या स्वीकारायच्याही प्रत्येक व्यक्तीला काही मर्यादा असतात. म्हणूनच मला खूप ज्ञान आहे असं म्हणणारा अज्ञानी असतो. जगातले अनेक विषय आपल्या माहिती पलीकडचे असतात. मात्र जगातल्या सगळ्या भावना सगळीकडे सारख्या असतात. प्रेम, दया, करुणा. त्यात आपण मागे राहता कामा नये." सरांनी संजूच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं.
-
Tyana Udu Dya (त्यांना उडू द्या)
संजीवनी बोकील या सिद्धहस्त लेखिका, संवेदनशील कवयित्री, विद्यार्थिप्रिय शिक्षिका. मराठी साहित्यक्षेत्रातलं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व. 'त्यांना उडू द्या...' या कुमारकथासंग्रहासाठी ही पाठराखण नव्हे, अंतर्मनातून आलेलं कौतुक, मनस्वी आनंदाची प्रचीती आहे. त्या मुळात विद्यार्थ्यांशी सकारात्मक नातं जपणाऱ्या शिक्षिका असल्यानं बालभावविश्वाचा नेमका वेध त्यांच्या कुमारकथेतून जाणवतो. 'त्यांना उडू द्या...' हे सूचक शीर्षक असलेल्या या संग्रहात मोठ्यांना छोट्या छोट्या वाटणाऱ्या कुमार भावविश्वातल्या बाबी संजीवनीताईंनी हळुवारपणे टिपल्या आहेत. प्रत्येक कथा ही संवेदनशील कुमारवयीन मनाचं तरल प्रतिबिंब आहे. या कुमारकथा कुमारांचं मन प्रगल्भ करणाऱ्या आहेत. प्रेम, त्याग, समंजसपणा, परोपकार, कष्टाचं महत्त्व, उदारता या सर्व सामाजिक मूल्यांचा सहज संस्कार म्हणजे 'त्यांना उडू द्या...' या कुमारकथा होत. संजीवनी बोकील यांच्याकडून असंच उत्तमोत्तम बालसाहित्यलेखन घडो, ही शुभेच्छा!
-
Jhad Ek Mandir (झाड एक मंदिर)
'झाड एक मंदिर' एक वेगळे आणि उत्सुकता वाढवणारे शीर्षक असणारी स्वाती कान्हेगांवकरांची किशोर कादंबरी संवेदनशील बोधप्रद आणि किशोरांना खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील हेमाआजी स्वत:च्या परदेशी असणाऱ्या नातवंडांच्या प्रेमासाठी व्याकुळ होते; पण आपले प्रेम, माया, वात्सल्य आजूबाजूच्या किशोरवयीन मुलांना भरभरून देऊन त्याच मुलांना आपली नातवंडे मानते. त्या मुलांना रसाळ गोष्टींतून संस्काराची शिदोरी देते आणि मुले संस्कारित होतात. आजीने दिलेली शिकवण मुलांमध्ये परिवर्तन घडवते याचा परिणाम, गोष्टीतील नाना-तात्या आजोबांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार मुले करतात तेव्हा वाचकांचेही डोळे पाणावतात. आजी आणि नातवंडांचे प्रेम पाहून खरंच कधी-कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती दाट आणि जवळची होतात याची प्रचिती येते. झाडाचे रक्षण-संवर्धन, मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया दाखवा, चराचर सृष्टीत ईश्वराचे रूप पहा, एकमेकांना सहकार्य करा अशा अनेक मूल्यांची रुजवण करणारी ही कादंबरी किशोरांच्या मनात एक नवज्योत प्रज्वलित करते. 'पुढे काय'च्या शोधात कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावी वाटत नाही यातच लेखिकेचे यश आहे. कादंबरी वाचताना लेखिकेची संवेदनशीलता पानोपानी दिसते. अनेक मूल्यांना सहजतेने लेखिकेने किशोरवयीन मुलांवर बिंबवण्याचा केलेला प्रयत्न अधोरेखित करण्यासारखा आहे. लेखिका स्वाती कान्हेगांवकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! -डॉ. अलका सुरेंद्र पोतदार
-
Jagala Pokharanari Davi Valavi (जगाला पोखरणारी डाव
बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती अशक्य आहे हे ओळखून डाव्या शक्तींनी जागतिक वर्चस्वाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवी घातक रणनीती आखली, जिचं उद्दिष्ट होतं पाश्चात्य जगताची कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यासारखी शक्तिस्थान॔ आतून पोखरून टाकत त्यांचा विध्वंस करणं. यासाठी त्यांनी अतिरेकी व्यक्तिवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकतेचा प्रसार, इतिहासाचं विकृतीकरण, धर्म आणि संस्कृतीची कुचेष्टा, अनिर्बंध स्थलांतराला प्रोत्साहन… यांचा आधार घेत कुटुंब, समाज, राष्ट्र यांना स्वयंविध्वंसाच्या टोकावर आणून उभं केलं. मार्क्सवादातील श्रीमंत वि. गरीब हा मूळ आर्थिक संघर्ष दूर ठेऊन वंश, लिंग, धर्म या सांस्कृतिक आधारांवर विविध गटांमध्ये सतत संघर्ष भडकत राहील अशी योजना राबवली. विशेष म्हणजे आपला विध्वंसक अजेंडा राबवण्यासाठी सामाजिक न्याय, पर्यावरणवाद, स्त्रीमुक्ती, सर्वसमावेशकता हे आकर्षक मुखवटे धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणंच अशक्य ठरू लागलं. या नवमार्क्सवादाने म्हणजेच वोकिझमने आता भारताकडे लक्ष वळवलं आहे. मूळ मार्क्सवादाच्या समोर दिसणार्या बंदुकीशी लढणं शक्य होतं पण आपल्याच लोकांचा बुद्धिभेद करून आतून पोखरणाऱ्या या वाळवीला आवरणं फारच कठीण आहे. म्हणून इतरांच्या अनुभवावरून आजच जागं व्हायला हवं. आकर्षक मुखवट्यांमागचा हा भेसूर, विध्वंसक चेहरा वेळीच ओळखायला हवा.
-
Vishnumay Jag (विष्णुमय जग)
निवड केलेले अभंग अत्यंत भावपूर्ण आहेत. लेखक प्रा. मधुकर डो यांनी उपयोजलेली भाषा अभिव्यक्ती ही खूप सुबोध आणि लाघवी असून निरूपण केलेल्या भाषेला सर्वसामान्यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचं मूल्य प्राप्त झालेलं आहे. लेखकाने निवडलेला शब्दसंग्रह आणि त्यातून अभंगगाथेतील काही शब्दांचा दिलेला अर्थसुद्धा उपयुक्त आहे. प्रत्येक अभंगाचे निरूपण करताना त्यांनी पहिल्यांदा स्वतःची दृष्टी त्या अभंगाबद्दलची व्यक्त केलेली आहे. नंतर अभंगाचे चरण दिलेले आहे. त्यानंतर अभंगाचा अर्थविस्तार केलेला आहे. परत एकदा शेवटी स्वतःचे मत मांडून त्याला वास्तवतेच्या स्वरूपामध्ये काय महत्त्व आहे हे स्पष्टीकरणासह मांडलेलं आहे. यामुळे वाचकांना या ग्रंथाचे वाचन करताना एक अद्वैत अनुभूती प्राप्त होईल. त्यातून संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थबोध तर होईलच परंतु एका अभ्यासकाने मांडलेला बोधात्मक अर्थसुद्धा या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. - प्रा. डॉ. हरिदास आखरे ( मराठी विभाग )
-
So I (सो आय)
सो आय...' ही रहस्यमय कादंबरी एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या अत्यंत नियोजित खुनाच्या तपासात वाचकाला गुंगवून ठेवते. तपासाची सुई वेगवेगळ्या पण संबंधित व्यक्तींकडे वळते, तेव्हा सामान्यपणे संशय त्याच व्यक्तीबाबत बळावतो. तीच व्यक्ती हा खून करू शकते अशी खात्री पटू लागते, नव्हे पटते. कादंबरी जेव्हा अंतिम वळणावर येते तेव्हा तपासाचा वेग वाढतो. वाचकाच्या काळजाचे ठोकेही वाढतात, कथेतला गुंताही वाढतो... आणि जेव्हा उकल होते तेव्हा..... रहस्यमय कादंबरी मराठी साहित्यात अभावाने वाचायला मिळते. बाबा कदम, सुहास शिरवळकर या दिग्गजांच्या पिढीनंतर श्री. मकरंद विनायक सापटणेकर यांची या पद्धतीची साहित्यकृती हाताळण्याची हातोटी खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी पदार्पणातच जर या क्षमतेची रहस्यमय कादंबरी लिहिली आहे तर त्यांच्या भविष्यातल्या लेखनाबद्दल खूप अपेक्षा ठेवण्याची मराठी वाचकाची मानसिकता होते यात काहीही नवल नाही. श्री. सापटणेकर यांच्या भविष्यातल्या प्रत्येकच साहित्यनिर्मितीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांच्या साहित्यनिर्मितीस मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि त्यांनाही वाचकांचे प्रेम लाभेल यात शंका नाही. - संतोष हुदलीकर
-
Amrutahuni God (अमृताहुनि गोड)
संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण चरित्र कादंबरी स्वरुपात
-
Raobahadur Dattatray Balwant Parasnis Charitra V K
आपण इतिहास वाचतो कारण इतिहासापासून शिकण्यासारखे बरेच असते. त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते. इतिहासातील चुकांपासून आपल्याला काही शिकवण मिळते. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात माणसाच्या गरजा मुळात कमी होत्या. सोयी कमी होत्या. फक्त माणसाच्या स्वप्ने पाहण्याला जशी मर्यादा नसते तशी त्या काळातही माणसे मोठी स्वप्ने पाहत असत. नुसती पाहत नसत तर ती पूर्ण करण्यासाठी झटत असत. पारसनीस याला अपवाद नव्हते. अगणित वस्तू आणि हजारो कागदपत्रे, जुनी चित्रे, नाणी याचा संग्रह असलेले भारतातील पहिले बहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय. त्यांची अफाट जिद्द, असीम इच्छाशक्ती, आत्मविश्वास याच्या बळावर ते हे पूर्ण करू शकले. शिक्षण अपुरे होते म्हणून ते हातपाय गाळून बसले नाहीत. त्यांची इच्छाशक्ती मजबूत होती. तिला त्यांनी प्रयत्नांची साथ दिली. शिक्षण म्हणजे सर्वस्व नव्हे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. जे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते पूर्ण झालेले पाहिले. आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी आपली कुवत जाणली होती त्याचबरोबर आपली ताकद ही पूर्णपणे जोखली होती. त्यांच्या ध्येयाच्या वाटेवर कोणकोणती आव्हाने आहेत? कोणते धोके पत्करावे लागतील? हे ते ओळखून होते. शिक्षणाची संधी जरी हुकली तरी, त्यांनी त्यांच्या इतिहासाच्या छंदाला मुरड घातली नाही. तो उत्तरोत्तर वाढतच गेला. संकटाचे संधीत रूपांतर करणे आणि आपली प्रगती करणे, ही शिकवण आजच्या युवा पिढीला त्यांच्या चरित्रातून घेता येण्यासारखी आहे.
-
Chiranjiv (चिरंजीव)
मी दिग्विजय कर्ण, आज अखेरच्या क्षणापर्यंत मी माझ्या मनाशी लढतो आहे. तुम्ही मला कित्येक हजार वर्षांपासून ओळखता आणि मीही तुम्हाला जाणतो! माझ्या जीवनाचे वेगवेगळ्या रूपातले तुम्ही साक्षीदार आहात. तुमचे जन्म बदलले, तरीही माझ्याशी असलेली एकरूपता तीच आहे. हा कर्ण तुम्हा साऱ्यात आजही जगतो आहे. तुम्हाला ओळखीचा वाटणारा हा कर्ण तुम्ही रणभूमीवर पाहिलात परंतु आज मी माझ्या मनोभूमीवर अखंड तेवत ठेवलेले युद्ध तुम्हास सांगणार आहे. शेवटी रणांगण तेच आणि योध्येही!
-
O Henrychya Laghukatha (ओ हेन्रीच्या लघुकथा)
आनंद, कारुण्य, प्रेम, चौर्य, उन्माद, उत्कंठा, क्षमा, क्षालन, अशा अनंत भावभावनांच नितांतसुंदर मिनिएचर म्हणजे ओ हेन्री च्या लघुकथा साहित्याच्या उंबरठ्यावर पाश्चात्य आणि पौर्वात्य सीमांना जोडणारे पुस्तक. रसिकहो तुमच्यासाठी...
-
Digital Bharat (डिजिटल भारत)
पूर्वी तंत्रज्ञान व संलग्न तंत्रे फक्त मूठभर श्रीमंतांच्या हातात असत. बहुजन समाज त्यापासून लांबच होता. चैनीच्या गोष्टी म्हणून उपकरणांची संभावना एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी होत असे. घरोघरी मातीच्या चुली जाऊन स्मार्टफोन, संगणक आले. तरुण पिढीने ते लवकर आत्मसात केले. पण प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांनीही यापासून दूर जाऊ नये, आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला हर तऱ्हेने सक्षम, स्वतंत्र, स्वतःच्या पायांवर उभे राहायला मदत करेल. 'सबलीकरणाचा' हा एक नवीन दृष्टिकोन आहे, हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.
-
Chala Thoda Common Sense Vapru Ya (चला थोडा कॉमन स
बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, कल्पनाशक्ती आणि विश्लेषणसामर्थ्य अशा अनेक देणग्यांनी समृद्ध असलेले आपण मनुष्यप्राणी… आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये साधा कॉमनसेन्स का बरं नाही वापरू शकत? तुम्ही कधी स्वतःला हे प्रश्न विचारले आहेत का... आपण का वैतागतो? आपल्याला राग नक्की कशाचा येतो? आपल्या मनात अपराधीपणाची भावना का निर्माण होते? आपण खोटे का बोलतो? कधी विनाकारण बचावात्मक पवित्रा का घेतो? लोकांचा एकमेकांवर विश्वास का नसतो? स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारण्यासाठी आपल्याला धडपड का करावी लागते? बरेचदा आपण आपले आयुष्य गुंतागुंतीचे का करून ठेवतो? आपण एखाद्यावर टीका करण्यात तत्पर असतो, पण त्यासंदर्भात त्या व्यक्तीशी स्पष्ट संभाषण मात्र आपण कटाक्षाने टाळतो, असे का ? खरे तर निव्वळ कॉमनसेन्स वापरुन आपण आपल्या समोरील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हे पुस्तक, आपल्याला सर्वपरिचित अशा दैनंदिन परिस्थिती आणि घटनांकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकवते. फक्त आपला दृष्टिकोन बदलून आणि थोडासा कॉमनसेन्स वापरून आपण आपल्या समस्या कशा सोडवू शकतो, किंवा निदान कमी करू शकतो यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या राग, निराशा, पश्चात्ताप, शोक, चिडचिड, दुःख आणि नैराश्य यासारख्या नकारात्मक भावनांना दूर ठेवायला शिकविणारे एक साधेसोपे सहज आचरणात आणण्याजोगे मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करते.