The Feast Of God ( द फिस्ट ऑफ गॉड)
प्रत्येक युद्धातून आपल्याला काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. पण तसा तो घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे हे खरे महत्त्वाचे असते. नाहीतर युद्धात जे सैनिक किंवा नागरिक प्राणास मुकले असतील, त्यांचे बलिदान व्यर्थच ठरते. इराक-कुवेत. युद्धानेही एक धडा जगाला शिकवला आहे. फ्रेडरिक फोरसीथ यांच्या बहुतेक कादंबर्या या एखाद्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या असतात. प्रस्तुत मूळ कादंबरीचे स्वरूपही असेच आहे. इराक-कुवेत युद्धाच्या आणि त्या वेळी जगभरात देशोदशी घडलेल्या राजकीय घटनांच्या प्रचंड पार्श्वभूमीवर एका प्रत्यक्ष घडलेल्या युद्धाच्या इतिहासामध्ये कौशल्यपूर्ण रीतीने गुंफलेली काल्पनिक पात्रांची कथानके, असे या मूळ पुस्तकाचे दोन पदर आहेत. त्यामुळे या पुस्तकाची भाषाशैलीही त्यांनी अपरिहार्यपणे दोन वेगळ्या प्रकारची वापरलेली आहे. मूळ पुस्तकात जेव्हा इतिहासात घडलेले प्रसंग किंवा राजकीय घडामोडी वर्णन केल्या आहेत, तेव्हा फोरसीथ यांची भाषा स्वाभाविकपणे काहीशी कोरडी, एखाद्या वृत्तनिवेदकाच्या शैलीची, त्रयस्थपणे घटनेचे वर्णन करणारी आहे. पण काल्पनिक किंवा खर्या पात्रांमध्ये, काल्पनिक किंवा प्रत्यक्ष घडलेले प्रसंग जेव्हा ते वर्णन करतात, तेव्हा मात्र त्यांची भाषा आपोआपच प्रसंगानुरूप त्या त्या भावना दर्शवणारी, त्या पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे अचूक वर्णन करणारी, त्यांचे परस्परसंबंध रंगवणारी अशी झालेली आहे.