Vimuktayan (विमुक्तायन)
‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय