Yashvantrao Chavan: Aathavani-Akhyayika (यशवंतराव
यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारे लेखन. लक्ष्मण माने यांनी या पुस्तकातून-पत्ररूपात सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आहे. लोकनेते यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी उलगडून दाखवले आहे. यात लक्ष्मण मानेंना बालपणापासूनच यशवंतरावांबद्दल कसे कुतूहल होते, इथपासून ते यशवंतरावांचा प्रत्यक्ष लाभलेला सहवास या कालखंडाचा सजगतेने, संवेदनशीलपणे केलेला अभ्यास व मोठा कालपट माने वाचकांसमोर मांडतात. यशवंतरावांचा जनसंपर्क, लोकांबद्दलचे प्रेम, पक्षनिष्ठा नवनवीन योजना राबवण्याची त्यांच्या मनात असलेली उर्मी, साहित्य,कला, संगीतप्रेम या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकात माने यांनी घेतला आहे. खरं तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास. हे सर्व असूनही खऱ्या अर्थाने लोकांशी असलेली आपुलकीची नाळ व कवीमन अखेरपर्यंत ठेवून सतत जमिनीवर पाय असलेला हा अवलिया. रूढार्थाने यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या हयातीतच आख्यायिका बनून राहिले होते, यात तीळमात्रही शंका नाही. त्या सगळ्या गोष्टीचा घेतलेला सामाजिक, राजकीय व मानवतेच्या दृष्टीने घेतला वेध म्हणजेच हे पुस्तक होय !