Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 2 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग 2)
संपूर्ण विश्वात प्राचीन कालापासून विविध संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या व अपूर्व असा इतिहास निर्माण करून गेल्या. हजारो वर्षांपासून ठराविक भूप्रदेशाचा व सर्वसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरांचा वारसा सांगणाऱ्या कित्येक संस्कृती आजघडीला काळाच्या उदरात नष्ट झालेल्या आहेत वा स्मृतिबाह्य ठरल्या आहेत. आफ्रिकेतील इजिप्त सभ्यता, मध्य आशियातील सुमेरियन सभ्यता, मेक्सिकोची माया सभ्यता, युक्रेटिस नदीकाठची बॅबिलोनियन सभ्यता, चीनची ह्वांग हो नदी खोऱ्यातील सभ्यता, मोहेंजोदडो येथील सिंधू सभ्यता, हिंदुस्थानातील गंगा-यमुनेच्या तीरावरील 'सनातन' म्हणून ओळखली गेलेली वैदिक संस्कृती या जगभरात विखुरलेल्या महत्त्वाच्या तसेच ठळक सभ्यता व संस्कृती आहेत. ग्रीक, बॅबिलोनियन, सुमेरियन, असिरियन या प्राचीन संस्कृती प्रगत व वेगवान असूनही काळाशी एकरूप न होता आल्याने लयास गेल्या, तर सिंधूसारख्या वैभवशाली संस्कृती निसर्ग व मानवी आक्रमणापुढे नेस्तनाबूत झाल्या. मात्र कित्येक हजारो वर्षांपासूनचा सलग इतिहास लिपीबद्ध करून प्राचीन तसेच अतिप्राचीन काळाचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारी भारताची अतिप्राचीन परंपरा असलेली सनातन वैदिक संस्कृती ही भारताची शान, मान व जान आहे. सनातन संस्कृतीचे आगळेपण हे आहे की ही संस्कृती संशोधकीयदृष्ट्या जरी अतिप्राचीन ठरविण्यात आलेली नसली तरी आर्यांनी रुजविलेला प्राचीन वैदिक धर्म आजतागायत प्रवाहित आहे आणि हेच या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे!