-
Firavile Anante (फिरवले अनंते)
लेखक फिरोझ रानडे यांनी अनेक विदेश यात्रा केल्या तिथले अनुभव ,तसेच त्या शहरात भेटलेले लोक ,त्यांच्या शी निर्माण झालेले प्रेमाचे ,आपुलकीचे संबंध. त्यांचे वाटून घेतलेली सुखदुःखं असे अनेक अनुभव लेखकाने या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
-
Rashtrapati Pantapradhan Vad Sanvad (राष्ट्रपती पंतप्रधान वाद संवाद)
राष्ट्रपती व पंतप्रधान हे आपल्या राज्य व्यवस्थेचे दोन प्रमुख घटक . आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती या देशाचा प्रमुख आहे; पण त्याला कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत . पंतप्रधानांची निवड संसद करते व तो कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. या दृष्टीने राष्ट्रपती म्हणजे केवळ "रबरी शिक्का" हे खरे आहे का? याचे उत्तर नाही असे ठामपणे देता येईल. आपल्या संविधानाने लोकशाहीच्या सुरळीत कारभारासाठी जी अंकुश व्यवस्था निर्माण केली त्यातील हे महत्वाचे घटक आहेत आपल्या संसदीय इतिहासात राष्ट्रपतींनीवेळोवेळी महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत प्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्तींमध्ये वाद झाले आहेत ; पण संवादातून समन्वयाची परंपराही त्यांनी जपलेली दिसते. आपली लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्यात या वाद संवादाचेही मोठे योगदान आहे गेल्या ७० वर्षातील विविध घटना - घडामोडींच्या अनुषंगाने राष्ट्रपती-पंतप्रधान या नात्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
-
Chandravati Ramayan (चंद्रावती रामायण)
पूर्व बंगालमधील सोळाव्या शतकातील कवयित्री चंद्रावती. लोकसारणीनं तिनं रचलेली काव्यं उत्तरकालीन बंगाली संशोधकांनी परिश्रमपूर्वक अभ्यासली आणि जगासमोर आणली. आता डॉ. माधवी भट यांनी त्या कवयित्रीचा परिचय समग्रतेनं मराठी जगाला करून दिला आहे. यात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतोच, शिवाय बंगाली लोकपरंपरेतले अतिशय गोड असे गीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. चंद्रावतीचं रामायण हे खरं तर 'सीतायन' आहे. पूर्व बंगालच्या मातीतून वर आलेल्या तिच्या काव्यात तिथल्या लोकगीतांचा दरवळ तर आहेच, पण शतकांच्या स्त्रीमनाचा अतिशय उत्कट असा आविष्कारही आहे. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं केलेलं हे पुनर्वाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एका अल्पपरिचित पण सशक्त अशा भारतीय कवयित्रीची सर्वांगीण ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिल्याबद्दल डॉ. माधवी भट यांना मनःपूर्वक धन्यवाद. डॉ. अरुणा ढेरे
-
The House Of Paper (द हाउस ऑफ पेपर)
पुस्तकं वाचणं, पुस्तकांचा शोध घेणं, संग्रह करणं, आपल्या व्यग्र जीवनात फुरसतीचे काही तास रोज बाजूला ठेवून पुस्तकांच्या जगात हरवून जाणं, या राखून ठेवलेल्या वेळेच्या आधारावर आयुष्याचे घाव सोसत राहणं... ही प्रक्रिया वाचकाला आनंददायी आणि हवीहवीशी वाटत असते; पण ग्रंथसंग्रहाच्या आवडीचं वेडात रूपांतर झालं, की खिशाला कात्री लावून महागडी पुस्तकं विकत घेणं, त्यासाठी हळूहळू जगण्याचे सगळे प्राधान्यक्रम बाजूला सारत पुस्तकं अग्रक्रमाला येणं, आधी एक फडताळ, मग एक कपाट, नंतर एक खोली असं करत पुस्तकांना सगळ्या घराचा ताबा घेऊ देणं, संग्रहाची वर्गवारी करणं या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे सगळं समोर दिसत असूनही ग्रंथवेड काही वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. आणि हे वेड अखेरीस जे दुःस्वप्न वाचकापुढं उभं करतं, त्या दुःस्वप्नाची ही कादंबरी. एक अविस्मरणीय असा भीषण सुंदर अनुभव ती वाचकाला देते.
-
Adamura (अदमुरं)
“जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा. " बोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताजं, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. यात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक वाटणाऱ्या प्रसंगांकडे बघण्याची श्रेयाची सौंदर्यदृष्टी, ‘अतिपरिचयातब अवज्ञा' झालेल्या भवतालाची दखल घेणं, त्याला दाद देणं. ह्या पुस्तकातल्या ‘कथुल्यां'मध्ये पती-पत्नी, माय-लेक, सखा- सखी, अशा विविध नात्यांचे पदर गुंफलेले आहेतच. त्याशिवाय लेखिकेचं निसर्गाशी, ऋतूंशी-विशेषतः पावसाशी, परिस्थितीशी, निसर्गाशी, कविता, पुस्तकं, गीतांशी असलेलं नातं देखील सकारात्मकतेचं, आनंदाचं लेणं लेवून येतं आणि वाचकालाही आनंदित करून जातं. श्रेयाच्याच शब्दांत सांगायचं तर - हे पुस्तक म्हणजे - 'दुसऱ्या चैतन्याला हाक देणारी एका चैतन्याची आभा.' -- मंजिरी धामणकर
-
The Secret Wisdom Of Nature (द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर)
तुम्हाला हे माहीत होतं का? पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो ! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी ? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात ? निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात. पीटर वोललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.
-
Murder Mystery (मर्डर मिस्ट्री)
मानवी मनाच्या अज्ञात आणि अंधाऱ्या कोपऱ्यात काय दडलेलं असू शकतं? या प्रश्नाने अस्वस्थ होणाऱ्या प्रत्येकासाठी, दीपा देशमुख लिखित ‘मर्डर मिस्ट्री’ हे सत्य घटनांवर आधारित पुस्तक हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडांच्या जगात घेऊन जातं; जिथे सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र आणि भयावह आहे. संपत्तीचा हव्यास, सूडभावना, विश्वासघात, मालकी हक्क, राजकारण आणि मनातील विकृत इच्छा-आकांक्षा यांसारख्या अनेक कारणांमुळे घडलेले गुन्हे म्हणजे मानवी स्वभावाचं क्रूर दर्शनच होय. या पुस्तकातलं प्रत्येक पान वाचकाला एका थरारक तपासाचा साक्षीदार बनवेल. यात थंड डोक्याने आखलेले कट आहेत, तर कधी संतापाच्या भरात उचललेलं विध्वंसक पाऊल आहे, कधी परिस्थितीचा सूड घेण्यासाठी केलेलं अघोरी कृत्य आहे, तर कधी मानसिक गुंतागुंतीतून घडलेलं क्रौर्यदेखील आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या पुस्तकात केवळ देशविदेशातल्या गुन्ह्यांची नोंदच नाही, तर मानसशास्त्रीय विश्लेषण आणि न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा एक अस्वस्थ करणारा प्रवास आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ वाचत असताना तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होईल - असं खरंच घडू शकतं? मनोविकास प्रकाशित, दीपा देशमुख लिखित ‘मर्डर मिस्ट्री’ वाचायलाच हवं!
-
Vyasanchya Mata Aani Leki (व्यासांच्या माता आणि लेकी)
गंगा, सत्यवती या व्यासांच्या माता. त्यातून एक विलक्षण नाट्य समोर येतं. देवयानी, शर्मिष्ठा, दमयंती, अंबा, शिखंडिनी, सावित्री, द्रौपदी, गांधारी व कुंती यासारख्या अनेक तेजस्विनी व्यासांनी महाभारतात आपल्या प्रतिभेतून साकारल्या त्यांच्या या लेकींच्या जीवनसंघर्षाचा, त्यांच्या मूल्यांचा, अस्मितेचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा लेखिकेने घेतलेला हा समग्र वेध ! या लेकींची अनेकांनी सत्त्वपरीक्षा घेतली. त्यात त्या तर उत्तीर्ण झाल्याच, पण ज्यांनी ही परीक्षा घेलती ते मात्र अनुत्तीर्ण ठरले. अशा या कणखर स्त्रियांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारे, त्यांच्या तेजाचा वेध गेणारे हे चिंतनलेख.
-
Kamodini (कमोदिनी)
हा १० कथांचा संग्रह आहे. यातील बहुतेक कथा प्रेमावर आधारित आहेत. प्रेमाची वेगवेगळी परिमाणे असतात. प्रेमाचे विविध पैलू असतात. पण प्रेम हे प्रेमच असतं. प्रेम म्हणजे काय? काळजी घेणे, वाटून घेणे, आदर करणे, त्याग करणे आणि प्रेम करणे. पती-पत्नी, प्रियकर, शिक्षक-विद्यार्थी, पालक-मुले, दरबारी-ग्राहक, प्रत्येक नात्याचा अर्थ वेगळा असतो. या सर्व १० कथा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाचे दर्शन घडवतात, प्रत्येक प्रकार आपापल्या परीने अद्वितीय आहे. प्रत्येक पात्राचे वर्णन इतक्या जिवंतपणे केले आहे की, ते पात्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते, आपण त्यांच्यासोबत जगतो. शेवटची कथा 'आखिरएंड' ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या महान देशभक्तीवर आधारित आहे.