-
Mala Udhvasta Vhayachay (मला उद्ध्वस्त व्हायचंय )
स्वतःच्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्न रूप पाहणं जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर कित्येकांनी लिहिलंय... प्रसिद्ध पावलेल्या यशस्वी, कर्तबगार पुरुषांची चरित्रं... पण आत्मचरित्र लिहिलं, म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? आयुष्याला सर्वस्वी मांडणं हे ते भोगण्याहून कठीण वाटावं... न् तरीही कुठलीही महत्त्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या सगळ्या खिडक्या दारं उघडायचं ठरवलं, हे एक मूर्ख धाडस म्हणा किंवा काही म्हणा... शेवटी लिहिणं-सांगणं... या गोष्टी काही वेळा इतक्या अपरिहार्य अटळपणे घडत जात असतात की, समोर प्रेक्षक- वाचकवर्ग असला काय, नसला काय, त्या आपल्या बोलत असतात. मला एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्याय मागायचाय. माझ्यापुढे माझी भूमिका स्पष्ट आहे. माझ्या व्यक्तिगत आयुष्याची चामडी सोलून काढली पूर्णतः न् काही जण त्याला वातड म्हणाले, तरीही हरकत नाही. एक वेगळं अनुभवविश्व जगलेलं माझं आयुष्य या घडीला समोर येणं आवश्यक वाटतं मला - माझ्या दृष्टीनं, इथल्या साऱ्या कुंठित झालेल्या साऱ्या स्त्रियांच्या दृष्टीनं... बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्रं उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं...न् स्त्रीचं दुःख गृहीत धरलं जाणं हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतुक, सहानुभूती किंवा वाटोळं या तीन गोष्टींशिवाय दुसरं काहीही देऊ शकत नाही. समाजाला ते बळी जाणं अंगवळणी पडतं; सवयीचं होतं.
-
Cancer Grastha, Tarihi Swastha (कॅन्सरग्रस्त, तरीही स्वस्थ)
“गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने राग लोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही. आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात!!!” गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न! माया धर्माधिकारी ◆ कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.