-
Narsinha - Hiranya Kashyap Part -2 (नरसिंह - हिरण्य कश्यप भाग - २)
सूडाने पेटलेला हिरण्यकश्यप इंद्राचं राज्य उद्ध्वस्त करू इच्छित होता. परंतु मुलानेच आपल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो त्रस्त होता. नरसिंह प्रल्हादचा शोध घेण्यास निघतो, परंतु या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि एक प्राचीन विष ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण होतो. क्रोधाने पेटून उठलेली होलिका आपल्या भाच्याचा शोध घेते, परंतु त्याच्या बालपणीविषयीच्या वेदनादायी परिस्थितीबद्दलचं वर्णन तिच्या वाचनात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृतींवर पुनर्विचार करायला तिला भाग पडतं. हिरण्यकश्यप इंद्राला हरवू शकेल का? होलिका आपल्या भाच्याप्रति असणारा राग विसरू शकेल का? नरसिंह प्रल्हादला शोधू शकेल का आणि त्याच्याबाबतीत सांगितलं गेलेलं भविष्य खरं ठरेल का? हा अद्भुत रोमांचकारी प्रवास बेस्टसेलर लेखक केविन मिसाल यांच्या नरसिंह या पुस्तकत्रयीच्या दुसर्या पुस्तकात सुरूच आहे.
-
Narsinha - Pralhad Part -3 (नरसिंह - प्रल्हाद भाग - ३)
सूड. क्रोध. धार्मिकता. तीन व्यक्ती, नशिबाने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या, पण प्रभावांमुळे विभक्त झालेल्या. कोण टिकून राहणार? आपल्या आयुष्यात नरसिंहाला इतका राग कधीच आला नव्हता. हिरण्यकश्यपच्या मृत्यूनंतर आता तो काश्यपुरीवर राज्य करत आहे आणि सूड घेण्याची योजना आखण्यातच आपला वेळ घालवत आहे. चेनचेनच्या मृत्यूमागे असलेल्या इंद्रदेवाला मारण्याची त्याने शपथ घेतली आहे. नरसिंहाचा क्रोध जास्तच वाढत असल्याचं जेव्हा प्रल्हादाच्या लक्षात येतं तेव्हा, नरसिंहाने आणखी काही निरपराध लोकांचा जीव घेण्यापूर्वी आणि सर्वत्र अराजकता माजण्यापूर्वी त्याला थांबवायला हवं हे प्रल्हादला जाणवतं. परंतु जे आवश्यक आहे, ते तो करू शकेल? स्वतःला अंधारात न गमवता तो आपल्या एकमेव पित्यासमान व्यक्तीला मारू शकेल? केविन मिसाल यांच्या सर्वाधिक खपाच्या नरसिंह पुस्तकत्रयीच्या या अंतिम पुस्तकात भगवान नरसिंह आणि प्रल्हादच्या हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि थरारक गोष्टीची सांगता होते.
-
Kshama (क्षमा)
पल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार, विवाहित आयटियन तरुणी... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन (चेतू), तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यानंतर बऱ्याच कालावधीने ते एकमेकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतू अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंद्वात सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते की चेतूपासून मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी.
-
Sherlock Holmes Chya Samagra Kadambarya (शेरलॉक होम्सच्या समग्र कादंबऱ्या)
सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्या आणि ५ कथासंग्रहांचा समावेश आहे. रहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत
-
Samagra Jim Corbett (समग्र जिम कॉर्बेट)
जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत. या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत... स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात. सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर जंगल कथा.