-
Vyakti Ani Valli (व्यक्ती आणि वल्ली)
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही! अशा या व्यक्ती अणि वल्ली!
-
Shimplyatil Moti (शिंपल्यातील मोती )
उद्योजक शंकरराव बोरकर यांची यशोगाथा श्वेता गानू यांनी या पुस्तकात मांडली आहे. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या शंकरराव बोरकर यांनी स्वत:-चं औद्योगिक राज्य उभं केलं. त्याचबरोबर आपल्या गावात विविध उद्योग सुरू केले. उद्योग व्यवसायाबरोबरच सामाजिक प्रकल्पही उभारले. विविध संस्था व संघटनांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. गानू यांनी ही वाटचाल कुठल्याही तरुणाला प्रेरक ठरेल अशा पद्धतीनं मांडली आहे.
-
Ekpatrichya "Pyalya"tun (एकपात्रीच्या 'प्याल्या' त
एकपात्री कलावंत अनिल पारगावकर यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम केले. देशात, परदेशांत केलेल्या एकपात्री कार्यक्रमावेळी आलेल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आहे. 45 छोट्या छोट्या प्रकरणांमधून त्यांनी हे अनुभव खुसखुशीत विनोदी पद्धतीने लिहिले आहेत. या हकिगतींमध्ये मनुष्यस्वभावातील विसंगती, तसेच काही फजितीचे प्रसंग लेखकाने चांगले खुलवले आहेत.