-
Chittapavan (चित्तपावन)
गेंड्याच्या कातडीचा तात्या जमकर डोईवरची तिरकी टोपी हातात घेत दात काढून फक्त हसला. तात्या जमकर गावातल्या समाजवादी पक्षाचा म्होरक्या होता."वर्षातून एखादं शिबीर घेतलं,एकदोन मिरवणूक-मोर्चे काढले आणि पक्षाच्या तोंडावर हजार-पाच हजार रुपये फेकले कि समाजवादी म्हणून नाना धंदे करायला तू मोकळा." अशा भाषेत बंडूनाना त्याला उडवून लावीत असत. त्याचा रागाने तो म्हणाला,"बंडूनाना, तुम्हाला समाजवादाची कावीळ झाली आहे." आणि शिष्टपणाने विचारू लागला,"बंडूनाना, एव्हड्या पुढच्या गोष्टी करायला आपण टिळक आहोत कि सावरकर?" "अरे त्यांची नावसुद्धा तोंडात धरण्याची तुमची लायकी नाही आणि हे बघ तात्या-" तात्याचा चेहेरा समोर धरून त्याच्या डोळ्यात नजर घुसवीत बंडूनाना म्हणाले,"माझं म्हणशील ना? तर मी नखाएव्हडा का होईना,पण टिळक आहे आणि केसाएवढा असेन,पण सावरकर सुद्धा आहे!"
-
Gavthan (गावठाण)
"गावठाण" हि कृष्णात खोत यांची पहिलीच कादंबरी." दुसःह दारिद्र्यात जन्मलेल्या,संकटांना सतत सामोऱ्या जाणाऱ्या,उपजत शहाणपण असलेल्या आनंदी नावाच्या दुखी मुलीची-तिच्या उलघाल करणाऱ्या जीवनानुभवाची हि कहाणी. विषण्ण करणारी. आनंदीसामावेत तिचे कष्टकरी आई-वडील, धाकटा भाऊ, मैत्रिणी, सगेसोयरे,दुरावलेलं सासर यांचं-भोवतीच्या गावगाड्याच-हृदयस्पर्शी ह्या कहाणीत येतं. पिकं,गुराढोरं,पशुपक्षी,झाडझूड,डोंगरदऱ्या,वाऱ्याचा भरार,निर्मल नदी,कौल देणारी तांबुजाई आदीचं विलक्षण दर्शन घडतं. मानवी नात्यातील भावबंधांचा भीषण आणि कोमलही रूप प्रकट होतं. आणि एक अख्खं अनोळखी खेडं ओळखीचं होऊ लागतं... कृष्णात खोत यांचं बालपण,पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यात गेलेलं. आजही त्यांचं त्या भूमीशी अतूट नातं आहे. त्या आसमंताचा गंध 'गावठाण' मध्ये सर्वत्र भरून राहिला आहे. कुठल्याही पारंपारिक संस्कारांचा स्पर्श नसलेली,सहजपणे उलगडत आलेली हि स्वयंभू कादंबरी मराठी ग्रामीण साहित्याचा नवा टप्पा गाठत असल्याचं जाणवतो.
-
Manvantar. (मन्वंतर)
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय,पण त्याचवेळी आजच्या तंत्र विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं,अगदी झपाटून विज्ञानकथांच लेखन करतानाही दिसतायेत. त्यांच्या कथांमधून मग कधी,तंत्राशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं. मानवी जग डोकावतं, तर कधी दृश्य जगापल्याडच्या अव्यक्त दुनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते. अनेकदा कालगतीच्या संदर्भात केलेलं घटित-अघटीताच सूक्ष्म अन्वेषण तर वाचकाला पुरतं चक्रावून सोडतं. एकंदरच ज्ञान-विज्ञानातील गृहीत-कल्पित परीमाणांना साकारणाऱ्या या विज्ञानकथा वाचकाच्या मनाचा नेमका ठाव घेतात.
-
Daah (दाह)
"माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्व असतं. माणसाची जडण-घडण याच माध्यमातून होत राहते. जनावरांचाही असच असतं. भले त्यांचे मापदंड वेगळे असतील; पण दोन घटकात संवाद हा घडतंच राहतो. दोन माणसं कधी एकत्र येताना दिसतील, तर कधी एकमेकांच्या बोकांडी बसलेलीही आढळतील. प्रेम, वात्सल्य, आशा-आकांक्षा,इर्षा, स्पर्धा,संघर्ष,अशा अनेक निरयांचा हा हुतुतू. तो कधी कोणतं वळण घेईल,याचं अनुमान बांधणही कठीण. मात्र, या सर्व बाहुल्यांना खेळवण्याच काम करते ती भोवतालची परिस्थिती! तिला पायदळी तुडवून एखादं पुढे गेलं तर ते महानायक/महानायिका ठरतं. इतरांसाठी मात्र ते असतं तेच ते रिंगण. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं; झापडबंद...! कधी झापड सरकलं,घसरलं, तुटलं, खाली पडलं तरी चालत राहायचं,उर फाटेस्तोवर!" …. असाच हा दाह!
-
To Tee (तो ती)
वेगवेगळी नाती, त्यातील बंध त्यातील मौज सांगणारी आणि त्यांतील गुंते उलगडणारे सुधीर गाडगीळ यांचे हे पुस्तक. मैत्री, उसनं प्रेम, पती, पत्नी और वो, बोलघेवडी, मिस फिट अशा शीर्षकाखालील छोटेखानी लेखांचा हा संग्रह मन प्रसन्न करतो आणि नात्यांकडे अधिक सजगपणे पाहायला शिकवतो. वेगवेगळे प्रसंग, घटना आणि संवादांमधून ही नाती आपल्या समोर येतात. नकोशी, हवीशी, निरागस, निखळ, मैत्रीची अन प्रेमाची निराळीच व्याख्या ती सांगतात. या नात्यांमधला आनंद, समाधान किंवा ओझे अथवा ताणही दिसतो. शिवाय ही नाती काही एका विशिष्ट वयाचीही नसतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती निर्माण होतात आणि आयुष्याला समृध्द बनवतात.