-
Chirantanacha Gandha (चिरंतनाचा गंध)
'सोलेदाद' आणि 'आतंक' या दोन संग्रहांनंतरचा 'चिरंतनाचा गंध' हा विलास सारंग यांचा मराठीतील तिसरा कथासंग्रह. वर्तमानातील एकाकीपणा, आत्मदुरावा, असंगतता, व्यक्तीच्या मनातील अनाकलनीय काळोख, या सर्व गोष्टींचा वेध घेणारी सारंगांची कथा 'चिरंतनाचा गंध' मध्ये समूहापर्यंत पोहोचली आहे. अगोदरच्या खास आधुनिकवादी आशयसूत्रांमधील ताणतणाव या संग्रहातील कथांनी टिकवून ठेवले आहेतच; त्यांच्या बरोबरीने सारंगांच्या कथेमध्ये आता भूतकाळाला आणि सांस्कृतिक अर्थनिर्णयनाला कळीचे महत्व येऊ लागले आहे. 'चिरंतनाचा गंध' मधील कथांमध्ये आदिम मिथ्यकथा आणि वर्तमान परिस्थिती यांचे अद्भुत मिश्रण आहे. अस्तित्वाच्या कडेलोटापर्यंत येऊन पोहोचलेल्या नैतिकतेचा कस पाहणाऱ्या घटना आहेत. वास्तवापासून अतिवास्तवापर्यंतचे भव्य परिप्रेक्ष्य आहे. या सर्व घटकांना वेधून असणारी सारंगांची विलक्षण तीव्र, अंतर्भेदी अशी कल्पनाशक्तीही आहे. 'चिरंतनाचा गंध' यामुळेच लक्षणीय ठरतो. मराठी कथेला वेगळी परिमाणे देण्याची क्षमता या कथांमधून खात्रीने प्रत्ययाला येते.
-
Karanta (करंटा)
स्वातंत्र्योत्तर कालखंडामधील अनेक स्तरांवरील नैतिक अधः पतनाची कथा भाऊ पाध्ये यांच्या करंटा या कादंबरीतून साकार होते. या कादंबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनचे जग त्याला असलेल्या अनेक परीमानांसह उभे राहते. स्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधील राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टींचा लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे मांडतात. कामगार चळवळीचे आतून चित्रण करताना त्यांची मानुस्पनावरची नजर किंचीतशीही हटत नाही. -हरिश्चंद्र थोरात
-
Char Bhinti Ek Chappar (चार भिंती एक छप्पर)
प्रदीर्घ संसारिक जीवनातील कडू-गोड अनुभवांचा चिंतनगर्भ अविष्कार.
-
Harit Vasaicha Ladha (हरित वसईचा लढा)
वेगवेगळ्या राजवटी पाहिलेली वसई आणि परिसर हा मुंबईलगतचा निसर्गरम्य प्रदेश. त्याचं हे निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचं भान परकीयांनीही ठेवलं. त्याला 'हरित संरक्षित भाग' असा दर्जा दिला. तो प्रदेश तीस वर्षांपूर्वी धनदांडगे, बिल्डर आणि सरकारी धोरणांच्या वक्रदृष्टीत सापडला. पैसा आणि दहशतीच्या जोरावर इथली हिरवी शेतं बांधकामांच्या वाळवीनं गिळंकृत व्हायला लागली. भ्रष्टाचारामुळे प्रदेशाला अवकळा येऊ लागली. या निसर्गरम्य परीसराचं अस्तित्व टिकविण्यासाठी उभी राहिली हरित वनराई संरक्षण समिती' फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारख्या धर्मगुरूंपासून सर्व थरांतील लहान-थोरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या लढ्याला विजय तेंडूलकर, माधव गडकरी, कुसुमाग्रज, मेधा पाटकर, ज्युलिओ रिबेरो, उल्हास जोशी अशा अनेक दिग्गजांचा पाठींबा मिळाला. या संघर्षातील एक अग्रणी मार्कुस डाबरे यांनी मांडलेली ही संघर्षकहाणी.
-
Nrutyasaudamini Damyanti Joshi(नृत्यसौदामिनी दमयंत
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचे कलाजीवन कृतार्थ ठरले तरी व्यक्तिगत जीवन मात्र अशांत राहिले...
-
Pahila Bhartiya Vaimanik (पहिला भारतीय वैमानिक)
दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन - पहिले भारतीय वैमानिक. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश हवाई दलातून लढताना त्यांनी वैमानिक म्हणून मानाचे स्थान मिळवले. रत्नागिरीच्या या तरुणाचे आयुष्यच भन्नाट! त्याने प्रत्येक साहसात उडी घेतली व तो जिंकत गेला. त्याने आपल्या लष्करी प्रशिक्षणाचा लाभ स्वातंत्र्यचळवळीतील भारतीय तरुणांना करून दिला. त्याची चरित्रकथा सांगता सांगता लेखकद्वय ह्या पुस्तकात उभा करतात तो त्या विशिष्ठ संदर्भातील कालपट...
-
Rudraksha (|| रुद्राक्ष ||)
धार्मिक वृत्तीचे लोक मंत्रपठन व जपासाठी अनेक प्रकारच्या माळा वापरतात; परंतु रुद्राक्षमाळ सर्वश्रेष्ठ आहे असे शास्त्र सांगते; व याला वैज्ञानिक आधार आहे. वैदिक वाङ्मयातून रुद्राक्षाची महती वर्णिली आहे. जाबालोपनिषद तर संपूर्णपणे रुद्राक्षाला वाहिलेले उपनिषद आहे. रुद्राक्षाला पदार्थविज्ञान व रसायनविज्ञानाच्या कसोट्या लावून काही चिकित्सा केल्या आहेत त्याचा तपशील या पुस्तकात दिला आहे.रुद्राक्षाला भद्राक्ष म्हणून, बनावट रुद्राक्ष संबोधणारे लोकही आहेत. त्यांच्या व दिशाभूल करणार्या रुद्राक्षांच्या अन्य गोष्टींचीही माहिती या पुस्तकात सांगितली आहे. शिवाय रुद्राक्षाचे धार्मिक स्वरूप, औषधी गुणधर्म, ज्योतिषशास्त्र, मंत्रसामर्थ्य आणि लंबकचिकित्सा याही बाबींचा ऊहापोह याच पुस्तकात केला आहे. रुद्राक्षासंबंधीची चौफेर माहिती असलेले मराठीतील हे पहिलेच पुस्तक होय.