-
Cutting Free
ही एक अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या पाकिस्तानी स्त्रीची विलक्षण कहाणी आहे. आयुष्यानं निरनिराळ्या टप्प्यांवर घेतलेली अनपेक्षित वळणं झेलताना लेखिका सलमा अहमद यांनी त्यांच्या बिझनेस, राजकीय कारकीर्द व कौटुंबिक जीवन यांबद्दल, यशापयश, भावनिक आंदोलनं यांबद्दल अतिशय प्रामाणिक व मनमोकळं कथन केलं आहे. सलमा अहमद यांच्या जीवनातले अतिशय उत्तुंग नाट्यमय क्षण वाचकाला रोमांचित करतात तर त्यांच्या जीवनातल्या अनेक काळ्याकुट्ट क्षणी त्यांनी दाखवलेलं विलक्षण धौर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास स्तिमित करतो. सलमा अहमद यांच्या व्यक्तिगत आयुष्याबरोबरच या कथनातून उपखंडातील संस्कृती, तत्कालिन पाकिस्तानी समाज, सरंजामी जीवन आदींचेही विविधांगी पदर वाचकासमोर उलगडतात. बिझनेस व राजकारण या दोन्ही क्षेत्रांत "वूमन ऑफ सबस्टन्स' ठरलेल्या सलमा अहमद यांचं हे विलक्षण अनुभवकथन वाचकाला एका निराळ्या विश्वाची व स्त्रीशक्तीच्या अफाट सामथ्र्याची ओळख करून देते.
-
Deception Point
आक्र्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. 300 वर्षापूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न दा विंची कोड व एंजल्स अॅण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका.
-
Jidnyasapurti
विज्ञानविषयी उत्कृष्ट व रंजक लेखक करणार्यात निरंजन घाटे हे नाव आज आघाडीवर आहे. विज्ञान विषयावर श्री घाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. 'जिज्ञासापूर्ती’ हा विषयही सदैव कुतूहल निर्माण करणारा आहे हे ओळखूनच त्यांनी या पुस्तकांची निर्मिती केली असावी. कारण सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यावरील प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम या प्रकारामुळे तर हा विषय परवलीचा ठरला आहे. या पुस्तकात एकूण 69 छोटे छोटे लेख समाविष्ट असून अनेक, लेखांना चित्रांचीही जोड दिलेली आहे. पृथ्वीचे वातावरण खरेच तापते आहे का ? रात्रपाळी करण्यामुळे त्रास होतो का ? क्लिओपात्रा खरंच अस्तित्वात होती का ? जाड माणसे अधाशी असतात का ? मंगळावर सजीव आहेत की नाहीत? उडत्या तबकड्यांचे गूढ, पैशाचा जन्म कधी झाला ? स्त्री आणि विज्ञान यांचे का पटत नाही ? चंद्रावर पाणी आहे का ? अशी अनेक प्रश्नांचे कुतूहल आपल्या 69 लेखांतून शमविण्याचा श्री. घाटे यांनी प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील सर्व लेख वाचून, नीट समजावून घेतले तरी वाचकांच्या सामान्यज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना अनेक भौगोलिक प्रश्नोत्तराचे भांडार म्हणून वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करील. यात शंका नाही.
-
No God In Sight
ही एक धीटपणे लिहिलेली अशी पहिलीच कादंबरी आहे, की ज्यात एखाद्या शहराची सार्वत्रिक जाणीव टिपलेली आहे आणि मुस्लीम मनाचा कानोसा घेतलेला आहे. ही कादंबरी वेगवान असून एका नवीन शोधलेल्या प्रकारात मोडते. यातील घटनांची दखल ही प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून पाहून घेतलेली आहे. एक गर्भपात करणारा तज्ज्ञ, एक बाटगा, एक गरोदर कुमारिका, एक निर्वासित, लपून बसलेला एक गुंड, एक खाटिक आणि एक सहानुभूतीशून्य चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अशी व अन्य पात्रे यात आहेत. शिवाय अनेक तरुण माणसे व स्त्रिया ह्या लौंगिक आकर्षणाचे अंतिम परिणाम जोखण्याचे प्रयत्न करीत असतात. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवरती मुंबई शहर आहे. हे शहर माणसाला पूर्ण समाधान देऊ इच्छिते. पण या शहरापुढे सपशेल शरणागती पत्करली तरच ते तुम्हाला जगू देते. पुस्तकांच्या जगात एका नवीन आवाजाची नांदी करणारी समर्थ कादंबरी !
-
Punyabhumi Bharat
"प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. अनेक अनुभवांना आपण सर्वजण सामोरं जात असतो. पण माझ्यासारखीचा गरीब, श्रीमंत अशा विविध वर्गातील लोकांशी सतत संबंध येत असतो. त्यामुळे माझ्या अनुभवांची क्षितिजं विस्तारित झालेली आहेत. आपलं मन संवेदनशील असेल, आपल्याला आपले विचार स्पष्टपणे, नि:पक्षपाती वृत्तीनं मांडता येत असतील, आपल्या अंगी सूक्ष्म निरिक्षण-शक्ती असेल तर आपल्यापैकी कोणालाही लिहिता येऊ शकतं. मीही केवळ तेवढंच केलं आहे. माझं काम ज्या प्रकारचं आहे, त्यामुळे मला विविध सामाजिक कार्यक्रमामधून वावरण्याची संधी मिळते. या पुस्तकातील 'मातृत्व' या कथेतील मीरा, 'फाळणी' या कथेतील रूपा कपूर, 'परदेशी' या कथेतील तक्षशीला या स्थळाला मी दिलेली भेट, 'स्वार्थ' या कथेतील सुनामीग्रस्तांबद्दल आलेले अनुभव... या आणि अशा काही गोष्टी फारच थोड्या व्यक्तींच्या आयुष्यात घडत असतील. माझ्या या सगळ्या अनुभवांना वाचकांकडून एवढी मागणी कशी काय... या अनुभवांचं एकवीस भारतीय भाषांमध्ये भाषांतर कसं झालं... या गोष्टीचं मला स्वत:लाच कधीतरी आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. मग त्या प्रश्नाचं एकच उत्तर मला सापडतं... माझं लेखन खूप सरळ, साधं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळेच्या सगळे अनभव खरेखुरे आहेत. कोणीही कितीही उच्चाधिकारपदी विराजमान असो, समाजातील स्थान काहीही असो, कितीही यश, कीर्ती, मानसन्मानाचे धनी असो, प्रत्येकाला सच्चेपणा नेहमीच मोहवून टाकतो. म्हणूनच आपल्या वाडवडिलांनी म्हटलंय.. 'सत्यम शिवम सुंदरम'. सुधा मूर्ती सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. या कथांमधून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं चित्रण आपल्याला दिसतं.